पुणे: महापालिकेत भाजपकडून मनमानी कारभार सुरू असून, राष्ट्रवादी काँग््रेासच्या नगरसेवकांना निधी देतानाही भेदभाव केला जात असल्याचे सांगत राष्ट्रवादी नगरसेवकांनी भाजपच्या विरोधातील तक्रारींचा पाढाच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर वाचला. त्यावर पवारांनी लवकरच हे सुरळीत होईल, असे म्हणत नगरसेवकांना आश्वस्त केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री पवार यांनी बारामती हॉस्टेल येथे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी शहराध्यक्ष सुनील टिंगरे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते नीलेश निकम उपस्थित होते. बहुतांश नगरसेवकांनी महायुतीत एकत्र असलेल्या मित्रपक्ष भाजपबद्दलची नाराजी व्यक्त केली. त्यात प्रामुख्याने क्षेत्रिय कार्यालयांच्या रचनेपासून अंदाजपत्रकात निधीवाटपात भेदभाव केला गेला आहे.
महापालिकेच्या मुख्यसभेतही नगरसेवकांना बोलायला संधी दिली जात नाही. एक दिवसात सभेचे कामकाज गुंडाळले जाते. प्रश्नोत्तर घेतली जात नाही, अशा स्वरूपाच्या तक्रारींचा समावेश यामध्ये होता. त्यावर पवार यांनी दादांच्या निधनानंतर लागलेली पोटनिवडणूक, पक्षसंघटनेतील कायदेशीर प्रकिया यामुळे तीन महिने मला बैठक घेता येऊ शकली नाही. मात्र, आगामी काळात सगळे सुरळीत होईल.
मी स्वत: यामध्ये लक्ष घातले आहे. महापालिकेतील प्रश्नांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून हे प्रश्न सोडवले जातील. महापालिकेच्या मुख्यसभेत जनतेच्या प्रश्नांवर संयमी भाषेत तुम्ही आवाज उठवा.
अभ्यासू पद्धतीने विषय मांडा. तसेच समित्यांच्या बैठकांना येणाऱ्या ऐनवेळच्या विषयांना विरोध करा. नगरसेवकांनी आधी ते समजून घ्यावेत, मगच त्यावर निर्णय घ्यावा, अशा सूचना पवार यांनी उपस्थित नगरसेवकांना केल्या असल्याची माहिती विरोधी पक्षनेते निकम यांनी दिली.
...अन् सुनेत्रा पवारांचे डोळे पाणावले
नगरसेवकांच्या बैठकीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या कामांच्या आठवणी निघाल्या. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह उपस्थित महिला नगरसेविकांचे अजितदादांच्या आठवणीने डोळे पाणावले. दादांनी खूप कामे केली आहेत. ही कामे आपल्याला पुढे घेऊन जायची आहेत, असे पवार यांनी सांगितले.