Pune Municipal Corporation Pudhari
पुणे

Pune Municipal Corporation Loan: पुणे महापालिका १,१६७ कोटींचे कर्ज घेणार; पाणी, पूरनियंत्रण अन् मलनिस्सारण प्रकल्पांना गती

समाविष्ट १२ गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी ४४५ कोटी; पूरनियंत्रणासाठी २००, मलनिस्सारणासाठी ५२२ कोटी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरातील पाणीपुरवठा, पूरनियंत्रण आणि समाविष्ट गावांतील मलनिस्सारण या महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी पुणे महापालिका १ हजार १६७ कोटी रुपयांचे व्यावसायिक कर्ज घेणार आहे. या कर्ज प्रस्तावाला स्थायी समितीने शुक्रवारी मान्यता दिल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

महापालिकेने यापूर्वी २०१७ मध्ये समान पाणीपुरवठा योजनेसाठी २०० कोटी रुपयांचे म्युनिसिपल बाँड उभारले होते. त्यानंतर प्रथमच एवढ्या मोठ्या रकमेचे कर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीयीकृत व अनुसूचित बँका तसेच वित्तीय संस्थांकडून स्पर्धात्मक पद्धतीने कर्ज प्रस्ताव मागविण्यात येणार आहेत.

महापालिकेत समाविष्ट झालेल्या १२ गावांसाठी पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये नऱ्हे, आंबेगाव खुर्द, नांदेड, नांदोशी, सणसनगर, किरकटवाडी, धायरी, उंड्री, आंबेगाव बुद्रुक, मांगडेवाडी, निळोठेवाडी आणि भिलारेवाडी या गावांचा समावेश आहे. या गावांसाठी २०० एमएलडीक्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचे नियोजन आहे. सुमारे ७१ किलोमीटरची ट्रान्समिशन लाइन, वितरण जाळे आणि मीटरिंगची कामेही केली जाणार आहेत. या योजनेचा एकूण खर्च सुमारे ८९० कोटी रुपये असून, त्यासाठी कर्जातून ४४५ कोटी रुपये उभारण्याचे नियोजन आहे.

शहरातील नाले रुंदीकरण व खोलीकरण, कल्व्हर्ट तसेच पाइप ड्रेनची कामे करण्यासाठी पूरनियंत्रण प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे ४०० कोटी रुपये असून, त्यासाठी कर्जातून २०० कोटी रुपये उभारले जाणार आहेत. समाविष्ट सात गावांमध्ये मलनिस्सारण व्यवस्था उभारण्यासाठीही कर्जाचा वापर केला जाणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे १ हजार ४४ कोटी रुपये असून, त्यासाठी कर्जातून ५२२ कोटी रुपये उभारण्याचे नियोजन आहे. या अंतर्गत ३५७ किलोमीटरचे सीवर नेटवर्क उभारले जाणार असून, मांजरी येथे ४५ एमएलडी आणि होळकरवाडी येथे १८.५ एमएलडीक्षमतेचे सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.

प्रकल्पांसाठी प्रस्तावित कर्ज

  • समाविष्ट १२ गावांची पाणीपुरवठा योजना : ४४५ कोटी रुपये

  • पूरनियंत्रण प्रकल्प : २०० कोटी रुपये

  • समाविष्ट सात गावांतील मलनिस्सारण : ५२२ कोटी रुपये

  • एकूण कर्ज : १ हजार १६७ कोटी रुपये

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT