पुणे : हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील स्वच्छतेबाबत समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्याने महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील यांची तडकाफडकी बदली केली आहे. त्यांच्या जागी कार्यकारी अभियंता रवि खंदारे यांची नियुक्ती करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. तसेच, मलनिस्सारण विभागातील शाखा अभियंता, घनकचरा विभागातील आरोग्य निरीक्षक आणि मुकादम या तिघांवर कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.(Latest Pune News)
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी समाविष्ट गावांमधील पाहणी दौरा सुरू केला आहे. वाघोली, नगर रस्त्यानंतर आयुक्त राम यांनी शनिवारी (दि.18) रोजी सकाळी शेवाळवाडी आणि मांजरी परिसरात अचानक पाहणी केली. या वेळी त्यांनी स्वच्छता, ड्रेनेज व्यवस्था, अतिक्रमण, नाले आणि रस्त्यांवरील खड्ड्यांची स्थिती तपासणी केली.
दौऱ्यात आयुक्तांनी परिसरातील अस्वच्छता, रस्त्यांवर साचलेला कचरा आणि अपुरी स्वच्छता व्यवस्था पाहून तीव नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने आयुक्तांनी कामचुकार आणि निष्काळजी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर तातडीने बदली आणि निलंबनाची कारवाई केली.
दोन दिवसांपूर्वीच वाघोली परिसरातील पाहणीदरम्यानही आयुक्तांनी सहायक आयुक्त शीतल वाकडे, उप अभियंता विनायक शिंदे आणि गणेश पुरम या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. पुणे-सोलापूर महामार्गावरील दुभाजकांमधील अस्वच्छतेबद्दलही आयुक्तांनी गंभीर नाराजी व्यक्त केली. स्वच्छतेत ढिलाई अजिबात खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड इशारा देत संबंधित विभागांना तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले.
शहरातील अस्वच्छता, वाहतूक कोंडी, ड्रेनेज आणि अतिक्रमणाच्या समस्या दूर करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे; अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला आहे.