Illegal Gas Refilling Pune Pudhari
पुणे

Illegal Gas Refilling Pune: मुंढव्यात घरगुती गॅसचे बेकायदा रिफिलिंग; तिघांवर गुन्हा दाखल

गॅसगळती होऊन स्‍फोट होण्याचा धोका

पुढारी वृत्तसेवा

पुणे: घरगुती गॅस सिलेंडरमधून बेकायदा पद्धतीने गॅस काढून तो रिकाम्या सिलिंडरमध्ये भरून विनापरवाना विक्री करण्याचा प्रकार मुंढवा गावात उघडकीस आला. भरलेल्या सिलिंडरमधून पाइपद्वारे गॅस काढून दुसऱ्या सिलिंडरमध्ये भरला जात होता. या प्रकारामुळे गॅसगळती होऊन आग किंवा स्फोट होण्याचा धोका असल्याने मुंढवा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

भूपेंद्रप्रताप सुंदर सिंह (वय ३८), मानकराम सुखराम सियाक (वय ३९) आणि महेंद्र बाबूराम खिचड (वय १९) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, आर्थिक लाभाच्या उद्देशाने आरोपींनी मुंढवा गावात गॅस रिफिलिंगची व्यवस्था केली होती. भरलेल्या घरगुती सिलिंडरमधून पाइपच्या साहाय्याने गॅस काढून तो रिकाम्या सिलिंडरमध्ये भरला जात होता. यासाठी संबंधित विभागाची परवानगी घेण्यात आली नव्हती. तसेच, गॅस हाताळताना आवश्यक सुरक्षा उपाययोजनाही केल्या नव्हत्या.

७ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर केलेल्या तपासणीत विनापरवाना गॅस काढून दुसऱ्या सिलिंडरमध्ये भरला जात असल्याचे आढळून आले. गॅसगळती झाल्यास आग लागण्यासह स्फोट होण्याची शक्यता असल्याने परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण झाला होता.

पोलिस कर्मचारी एकता बाबूराव साळुंके यांच्या तक्रारीवरून मुंढवा पोलिस गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक स्मिता वासनिक तपास करीत आहेत.

अवैध रिफिलिंगवर पोलिसांची नजर

शहरातील अशा बेकायदा गॅस रिफिलिंगच्या प्रकारांवर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. विनापरवाना गॅस सिलिंडर रिफिलिंग होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिस उपायुक्त जीवन बेनिवाल यांनी केले आहे. तसेच, शहरातील सर्व गॅस डीलर्सची बैठक घेऊन त्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT