पुणे: बोरघाटात होणारी वाहतूक कोंडी दूर करण्याबरोबरच पुणे-मुंबई या शहरातील अंतर कमी करण्यासाठी लोणावळ्याजवळील सिंहगड इन्स्टिट्यूट ते खालापूर यादरम्यान बोगदा खोदून मिसिंग लिंक तयार करण्यात येत आहे.
येत्या ऑक्टोबरपर्यंत या मार्गाचे काम पूर्ण होत आहे. चाचण्यांनंतर येत्या डिसेंबरमध्ये ही लिंक वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-मुंबई प्रवासासाठी लागणारा वेळ अर्ध्या तासाने कमी होणार आहे, तर या दोन शहरांतील अंतरही सहा किलोमीटरने कमी होणार आहे. (Latest Pune News)
डोंगरात बोगदा खोदून तयार करण्यात येणार्या या रस्त्यासाठी 6 हजार 600 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. काही वर्षांपूर्वी जुन्या पुणे-मुंबई रस्त्याने प्रवास करताना अरुंद रस्ता, बोरघाटात होणारी कोंडी, यामुळे कित्येकदा 7-8 तासही लागत असत. द्रुतगती मार्गाच्या निर्मितीनंतर त्यात सुधारणा झाली व प्रवासाचा वेळ चार तासांवर आला.
तरी, घाटात होणार्या कोंडीला आळा घालण्यात हा मार्गही कुचकामी ठरू लागला. बोरघाटात होणारी कोंडी टाळून विनाअडथळा प्रवासासाठी मिसिंग लिंकचा पर्याय पुढे आला व शासनाने त्याची अंमलबजावणी केली. या लिंकमुळे प्रवासाच्या वेळेत आणखी अर्ध्या तासाची बचत साध्य होईल, असा वाहतूकतज्ज्ञांचा अंदाज आहे.
गेल्या काही वर्षांत पुणे हे ‘आयटी हब’ म्हणून उदयाला आले असून, येथून मुंबईला जाणार्या प्रवाशांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे, तसेच येथून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणार्या प्रवाशांची संख्याही लक्षणीय आहे. अशा सर्व प्रवाशांसाठी ही लिंक वरदान ठरणार आहे.
... असा असणार प्रकल्प
लोणावळ्याजवळील सिंहगड इन्स्टिट्यूट ते खालापूर यांना जोडणारी ही मिसिंग लिंक आहे. सध्या हे अंतर 19 कि.मी. आहे, तर मिसिंग लिंकची लांबी 13.3 किमी असणार आहे. त्यामुळे पुणे-मुंबई यादरम्यानचे अंतर 6 किमी ने कमी होईल.
या लिंकमध्ये असलेल्या बोगद्याची एकूण लांबी 10.55 किमी आहे. त्यापैकी 2.5 कि.मी. बोगदा लोणावळा डॅमच्या 175 मीटर खालून जातो. हा बोगदा आशिया खंडातील सर्वांत रुंद बोगदा असून, त्यांची रुंदी 23.75 मीटर आहे. या मार्गात 2 केबल स्टेड पूल आहेत. एकाची लांबी 900 मीटर, तर दुसरा 650 मीटर लांबीचा आणि 26 मीटर रुंदीचा आहे. त्यांच्या बांधकामासाठी सुमारे 31 हजार टन स्टील आणि 3.5 लाख घनमीटर काँक्रीट वापरण्यात आले आहे. या पुलाचे आयुष्य किमान 100 वर्षे असेल, असा तज्ज्ञांचा दावा आहे.
या मिसिंग लिंकमुळे घाटात होणारी वाहतूक कोंडी टाळणे शक्य होईल. बोगद्यात दरडी कोसळू नयेत, यासाठी सर्वत्र ‘रॉक बोल्ट’ आणि सुरक्षा जाळ्या लावण्यात आल्या आहेत. बोगद्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास बाहेर पडण्यासाठी प्रत्येकी 300 मीटरवर एक्झिट मार्ग तयार करण्यात आले आहेत.
प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये
केबल स्टेड पुलाची देशात प्रथमच उभारणी
प्रकल्प सुरू झाल्यावर वेगमर्यादा ताशी 120 किलोमीटरपर्यंत वाढणार
पावसाळ्यात दरडी कोसळल्या, तरी या मिसिंग लिंकमुळे वाहतूक ठप्प होणार नाही.
या मिसिंग लिंकचे काम 2019 पासून सुरू होते; मात्र कोरोनामुळे त्यामध्ये काही काळ अडथळे आले.
पुणे-मुंबई या महामार्गावरील लोणावळ्याजवळ सुरू असलेल्या मिसिंग लिंकचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. काही महत्त्वाचे फिनिशिंग सुरू आहे. हा मिसिंग लिंक मार्ग डिसेंबरपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.- राहुल वसईकर, अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, पुणे