Pune Railway Station Pudhari
पुणे

Pune Mumbai Expressway Traffic: पुणे–मुंबई एक्स्प्रेस वे बंद; रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी, एसटीच्या 120 फेऱ्या रद्द

गॅस टँकर अपघाताचा परिणाम; रेल्वे, बस आणि खासगी प्रवास ठप्प, प्रवाशांची मोठी कसरत

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर झालेल्या गॅस टँकरच्या अपघातामुळे बुधवारी (दि. 04) हा रस्ता बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे प्रवाशांनी आपला मोर्चा रेल्वेकडे वळवला. याचा थेट परिणाम पुणे रेल्वे स्थानकावर दिसून आला. मुंबईला जाण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

बुधवारी सकाळपासूनच एक्स्प्रेस वेवरील वाहतूक विस्कळीत झाल्याने अनेक खासगी बस आणि कार चालकांनी प्रवास रद्द केला आहे. परिणामी, पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या अनेक एक्सप्रेस आणि इंटरसिटी सारख्या गाड्यांना प्रवाशांची प्रचंड गर्दी केली होती. तिकीट खिडक्यांवर लांबच लांब रांगा लागल्याचे देखील बुधवारी पहायला मिळाले. एक्स्प्रेस वे बंद असल्याने एसटी बसचे तिकीट रद्द झाले, चारचाकीनेही जाता येईना. मग रेल्वेने जाण्याशिवाय पर्याय नव्हता, पण इथेही गर्दीचेच चित्र दिसले. त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना बुधवारी मोठी कसरत करावी लागली.

पुणे रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दी काहीशी वाढली आहे. मात्र, याची दखल घेत आम्ही परिस्थिती व्यवस्थित हाताळण्यासाठी आरपीएफ आणि तिकीट चेकींग स्टाफला सूचना केल्या आहेत. याशिवाय आमचे अधिकारी देखील येथे लक्ष ठेवून आहेत. गरज लागल्यास आम्ही आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहे.
हेमंत कुमार बेहरा, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक तथा जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे पुणे विभाग
पुणे-मुंबई एक्सप्रेस - वे बंद झाला आहे. माझे काम असल्यामुळे मी मुंबईला जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आलो. मात्र, येथेही गर्दी झाल्याचे चित्र दिसतेय. एक्सप्रेस वे कधी सुरू होणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने आता मुंबईला जाण्यासाठी रेल्वेशिवाय पर्यायच नाही.
आकाश पानसरे, प्रवासी

पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवरील वाहतूक विस्कळीत झाल्याचा मोठा फटका एसटी सेवेला बसला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या एसटीच्या 120 फेऱ्या बुधवारी (दि.04) रद्द केल्या होत्या. यामुळे कामानिमित्त मुंबईला जाणाऱ्या हजारो प्रवाशांचे हाल झाले असून, बस स्थानकांवर अनेक बसेस उभ्या असल्याचे दिसून आले.

अचानक ही परिस्थिती समोर आल्यामुळे पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक बुधवारी मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली. याचा फटका एसटीसेवेला मोठ्या प्रमाणावर बसला. एसटीने प्रवास करणारे चाकरमानी, सर्वसामान्य प्रवाशांची पुण्यातून मुंबईला जाण्यासाठी रेल्वे किंवा खासगी वाहनांचा पर्याय शोधताना दमछाक झाली. अचानक फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. आता कामानिमित्त मुंबईला कसे जायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर बुधवारी दिवसभर उभा ठाकला होता.

पुणे स्टेशन आगारातून एकही बस सुटली नाही

पुण्याहून मुंबई, दादर, ठाणे या भागासाठी बस पुणे स्थानकातून सुटतात. मात्र, बुधवारी (दि. 04) सकाळपासूनच परिस्थिती बिकट होती. पुणे स्टेशनवरून दररोज होणाऱ्या सर्व 40 फेऱ्या रद्द केल्या. हातात बॅगा घेऊन मुंबईला जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना रिकाम्या हाती घरी परतावे लागले.

स्वारगेटलाही मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी

फक्त पुणे स्टेशनच नव्हे, तर स्वारगेट बस स्थानकावरही अशीच परिस्थिती होती. स्वारगेट आगारातून मुंबईकडे जाणाऱ्या 80 फेऱ्या रद्द झाल्या. प्रवाशांना मुंबईला घेऊन जाणाऱ्या बस आगारातच उभ्या होत्या.

शिवाजीनगर आगारांतर्गत असलेल्या आमच्याकडील पुणे स्टेशन बसस्टँडवरून सुटणाऱ्या 40 फेऱ्या बुधवारी रद्द झाल्या. या सर्व बस येथेच उभ्या आहेत. मुंबईहून येणाऱ्या काही बस रस्त्यातच अडकून बसल्याचे समजले आहे. मात्र, पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील परिस्थिती निवळताच आम्ही आमच्याकडील बस प्रवाशांना तत्काळ उपलब्ध करून देऊ.
संजय वाळवे, वरिष्ठ आगार प्रमुख, शिवाजीनगर एसटी आगार
स्वारगेट आगारातून मुंबईकडे जाणाऱ्या सुमारे 70 ते 80 बस फेऱ्या रद्द झाल्या. या बस बुधवारी आगारातच उभ्या होत्या. पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील परिस्थिती आटोक्यात आल्यावर लगेच प्रवाशांसाठी बस उपलब्ध करून दिल्या जातील.
संतोष भोकरे, वरिष्ठ आगार व्यवस्थापक, स्वारगेट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT