पुणे: पुणे शहराच्या वाढत्या विस्ताराला आणि भविष्यातील पाण्याच्या वाढत्या मागणीला आता मुळशी धरणाच्या पाण्याचा आधार मिळणार आहे. शहराच्या पाणीपुरवठ्यात भर घालण्यासाठी मुळशी धरणातून तब्बल ८ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
त्यामुळे भविष्यात पुण्याच्या पाणीपुरवठ्यावरील ताण कमी होण्याची आशा निर्माण झाली आहे. आवश्यक प्रशासकीय आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पुढील दीड ते दोन वर्षांत हे पाणी पुणेकरांना उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे, अशी माहिती आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.
पुणे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांसह शहराच्या विस्तारित भागात पाण्याची मागणी सातत्याने वाढत आहे. याशिवाय पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएच्या हद्दीतही मोठ्या प्रमाणावर नागरीकरण होत आहे.
या वाढत्या लोकसंख्येला पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी सध्याच्या जलस्रोतांवर मोठा ताण येत आहे. खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठ्यावर पुण्याची मोठी भिस्त असल्याने पर्यायी जलस्रोत विकसित करण्याची गरज निर्माण झाली होती.
या पार्श्वभूमीवर मुळशी धरणातील पाणी पुण्यासाठी मिळावे, यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू होता. अखेर मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत आठ टीएमसी पाणी देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे पुण्याच्या भविष्यातील पाणी नियोजनाला मोठा आधार मिळणार आहे.
मात्र, धरणातून पाणी मंजूर झाल्यानंतर ते शहरापर्यंत आणण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर असेल. त्यासाठी स्वतंत्र जलवाहिनी, जॅकवेल, जलशुद्धीकरण केंद्र आणि वितरणव्यवस्था उभारावी लागणार आहे. या सर्व कामांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून त्यासाठी कोट्यवधी रुपयांची आर्थिक तरतूद करावी लागणार आहे.
मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत पुण्याच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. मुळशी धरणातून आठ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यास मान्यता मिळाली आहे. आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून पुढील दीड ते दोन वर्षांत हे पाणी शहरासाठी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका