Mosquito Pudhari
पुणे

Pune Mula Mutha Water Hyacinth: मुळा-मुठा नदी जलपर्णीच्या विळख्यात; कर्वेनगर परिसरात डासांचा वाढता प्रादुर्भाव

साचलेल्या पाण्यामुळे आरोग्य धोक्यात; जलपर्णी काढण्याचे काम सुरू

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहराची जीवनवाहिनी मानली जाणारी मुठा व मुळा नदी सध्या जलपर्णीच्या विळख्यात अडकली आहे. त्याचे थेट परिणाम नदीकाठालगत राहणाऱ्या लोकवसाहतींवर दिसू लागले आहेत. नदीपात्रातील जलपर्णीमुळे पाण्याचा प्रवाह मंदावला आहे. या साचलेल्या पाण्यात डासांची प्रचंड वाढ होत आहे.

कर्वेनगर, सनसिटी, एकता नगरी आदी भागांत संध्याकाळ होताच डासांचे थवे घरात शिरू लागतात. त्यामुळे नागरिकांची झोप उडाली असून, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथींची भीतीही डोके वर काढत आहे. पर्यावरणीय असमतोल, वेळेवर न होणारी स्वच्छता आणि वाढते तापमान या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून नदीकाठचा परिसर आरोग्यदृष्ट्‌‍या धोकादायक ठरत असल्याची चिंता स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.

शहराच्या हद्दीतील नद्या आणि तलावांमध्ये दर वर्षी जलपर्णी वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढते. ही जलपर्णी काढून टाकण्यासाठी महानगरपालिका दर वर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. तरीसुद्धा जलपर्णी पूर्णपणे नष्ट करण्यात महानगरपालिका अपयशी ठरत आहे. नदीपात्रात या वनस्पतीची वाढ होत असून, यामुळे डासांची पैदास वाढली आहे. जलपर्णी हे डास उत्पत्तीचे मुख्य कारण असून, ही जलपर्णी वेळत काढली जात नसल्याने नदीकाठच्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याशिवाय, उन्हाळ्यात पाण्याचे लहान साठे लवकर आटत नसल्याने डासांच्या अळ्यांना वाढीसाठी पुरेसा कालावधी मिळतो. वाढलेली आर्द्रता आणि उष्ण वातावरणामुळे डास अधिक सक्रिय होतात. परिणामी, संध्याकाळनंतर डासांचा त्रास तीव होतो. पंखे, कूलर किंवा एसी सुरू असताना काही प्रमाणात दिलासा मिळतो; मात्र वीजपुरवठा खंडित झाल्यास डासांचा उपद्रव अधिकच जाणवतो. त्यामुळे उन्हाळा सुरू होताच डास नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक ठरते.

नगरसेविका तेजश्री पवळे यांच्या मागणीनंतर जलपर्णी काढण्याचे काम सुरू

एकता नगरी, कर्वेनगर आणि परिसरातील नागरिक वाढत्या डासांच्या प्रादुर्भावामुळे त्रस्त आहेत. जलपर्णीमुळे निर्माण होणारे आरोग्य धोके ओळखून, भाजप नगरसेविका तेजश्री पवळे यांनी महापालिकेच्या पर्यावरण विभागाला राजाराम तलावाजवळील नदीपात्रातून जलपर्णी काढून टाकण्याची मागणी केली होती. तसे पत्र पर्यावरण विभागाला देण्यात आले होते. याची दखल घेत रविवारी राजाराम तलावाजवळ जाळी बसवण्यात आली असून, जलपर्णी काढण्याचे काम सुरू केले आहे.

उन्हाळ्यात डासांचा उपद्रव का वाढतो?

उन्हाळ्यात डासांचा उपद्रव वाढण्यामागे त्यांच्या जलद प्रजनन चक्राचा मोठा वाटा असतो. तापमान वाढू लागले की डासांची वाढ वेगाने होते. उष्ण आणि दमट हवामान हे डासांसाठी अत्यंत पोषक ठरते. साचलेले पाणी, गटारे, टाक्या, कूलरमधील पाणी, तसेच नदीपात्रातील जलचर वनस्पती या ठिकाणी मादी डास एका वेळी साधारण 100 ते 300 अंडी घालतात. उष्णतेमुळे ही अंडी अल्पावधीत उबवून त्यातून डास बाहेर पडतात आणि काही दिवसांतच त्यांची संख्या झपाट्याने वाढते.

दिवसा असो वा रात्री, डासांच्या उपद्रवामुळे घरात राहणे कठीण झाले आहे. मुले आणि वृद्धांना याचा सर्वाधिक त्रास होत आहे. प्रशासनाने तातडीने नदी स्वच्छ करावी
मंदार पित्रे, स्थानिक रहिवासी, एकता नगरी
गेल्या काही दिवसांपासून कर्वेनगर आणि परिसरातील नागरिक डासांच्या प्रादुर्भावामुळे त्रस्त आहेत. त्यामुळे प्रशासनाला नदीपात्रातून जलपर्णी त्वरित काढून टाकण्यास सांगण्यात आले. जलपर्णी काढण्याचे काम सुरू झाले असून, यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल.
तेजश्री पवळे, नगरसेविका
नागरिक आणि स्थानिक प्रतिनिधींकडून जलपर्णी काढण्याबाबत तक्रारी येत आहेत. महानगरपालिकेमार्फत नदीपात्रातून जलपर्णी काढण्याचे काम सुरू आहे. खराडी, मांजरी, राजाराम पूल इत्यादी भागात जलपर्णी काढण्याचे काम सुरू आहे. पुढील आठवड्यात जलपर्णी काढण्याच्या नव्या निविदाही काढण्यात येणार आहेत
किशोरी शिंदे, पर्यावरण विभाग प्रमुख, महानगरपालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT