चालक-मालकाला सात दिवस तुरुंगवास आणि 30 हजारांचा दंड...
वाहतूक नियम भंग प्रकरणी पुण्यातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई
पुणे : विनापरवाना (परमिट) आणि विना लायसन्स प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालक आणि मालकावर पुण्यातील मोटार वाहन न्यायालयाने कठोर कारवाई केली आहे. न्यायालयाने दोघांनाही प्रत्येकी पंधरा हजार रुपये दंड, असा एकूण तीस हजारांचा दंड ठोठावला आहे. यासोबतच दोघांनाही प्रत्येकी सात दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. या कारवाईनुसार त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
वाहतूक नियम भंग प्रकरणी पुण्यातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. आत्तापर्यंत पुणे आरटीओकडून फक्त वाहने जप्ती आणि मोठ्या दंडाच्या कारवाया होत होत्या. मात्र प्रकरण मोटर वाहन न्यायालयात गेल्यामुळे चालक-मालकाला दंडासह तुरुंगवासाची शिक्षा देखील आता भोगावी लागत आहे. या कारवाईमुळे सध्या वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पुणे आरटीओच्या वायुवेग पथकाने एका चारचाकी वाहनाला वाहतूक नियमभंग केल्याप्रकरणी ताब्यात घेतले होते. त्यानंतर, हे प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी आरटीओतील खटला विभागाने मोटार वाहन न्यायालयात सादर केले. मोटार वाहन न्यायालयाच्या न्यायाधीशांनी वाहनाचा परवाना (प्रवासी वाहतूक परमिट) आणि चालकाकडे लायसन्स नसल्याने, प्रवाशांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ, या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. याप्रकरणी न्यायालयाने पुण्यात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. या कारवाई अंतर्गत, चालकाला 15,000 रूपये दंड आणि 7 दिवसांचा तुरुंगवास, तर गाडीच्या मालकालाही 15,000 रूपये दंड आणि 7 दिवसांचा तुरुंगवास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. शिक्षेची तातडीने अंमलबजावणी करत दोघांनाही येरवडा कारागृहात पाठवण्यात आले आहे.
आरटीओ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई मोटर वाहन कायदा 192 ए आणि 181 नुसार करण्यात आली आहे.
"वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा आमचा निर्धार आहे. ही कारवाई त्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. विनापरवाना आणि लायसन्सशिवाय प्रवासी वाहतूक करणे, मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन आहे आणि यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. यापुढेही अशा प्रकारे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,"स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे
"न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह आहे. आरटीओने वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्याची गरज आहे. कठोर कारवाईसोबतच मार्गदर्शन आणि समुपदेशनही महत्त्वाचे आहे." या कठोर कारवाईमुळे पुण्यातील इतर वाहनचालकांमध्ये निश्चितच खळबळ उडाली आहे. वाहतूक नियम मोडण्यापूर्वी आता अनेकजण विचार करतील, ही कारवाई वाहतूक नियमांचे पालन करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा संदेश देत आहे.एकनाथ ढोले, महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटना पश्चिम महाराष्ट्र