पुणे: शहरात मान्सून येण्यास अजून पाच ते सहा दिवस वाट पाहावी लागणार आहे. कारण उत्तरेतून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे मान्सून सोलापूर ते बारामतीजवळ अडखळला आहे. परिणामी शहरात १८ जूनच्या सुमारास मान्सून सरी येतील, असा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे.
शहरात दररोज ढग दाटून येतात. शुक्रवारी सकाळी गार वारे सुटल्याने पाऊस येईल असा अंदाज होता. मात्र, दिवसभर उकाडाच जाणवला. याबाबत हवामान शास्त्रज्ञांनी सांगितले की, मागच्या वर्षी पुण्यात २६ मे रोजीच मान्सून आला. परंतु उत्तरेतून आलेल्या कोरड्या वाऱ्यांनी तो दहा ते बारा दिवस महाराष्ट्रातच खोळंबला होता. तशीच स्थिती यंदा झाली आहे. अजून पाच ते सहा दिवस मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे नाहीत.
पुण्यातील मान्सूचे आगमन ( १० वर्षे)
२०१७: १३ जून
२०१८: १० जून
२०१९: २६जून (सर्वात उशिरा )
२०२०: ११ जून
२०२१: १० जून
२०२२: २३ जून
२०२३: ११ जून
२०२४: ११ जून
२०२५: २६ मे (सर्वात लवकर)
नेमके काय झाले आहे?
आयएमडी, पुणे येथील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांच्या मते उत्तर भारतातील कोरड्या वाऱ्यांनी राज्यातील मान्सून खोळंबला आहे. अजून पाच ते सहा दिवस तो सक्रिय होण्याची शक्यता नाही. हा अल निनोचा प्रभाव नसून तो उत्तरेतील कोरड्या वाऱ्यामुळे दरवर्षी अडकतोच. तशीच स्थिती यंदा आहे.