पुणे: व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर हॉटेल तसेच रेस्टॉरंट व्यावसायिकांनी ‘एमएनजीएल’कडे कनेक्शनसाठी धाव घेतली. त्यानंतर ‘एमएनजीएल’ने अलीकडच्या काही दिवसांमध्ये जिथे पाइपलाइनची पायाभूत सुविधा आधीच उपलब्ध होती त्या ठिकाणी 40हून अधिक नवीन रेस्टॉरंटना नवीन कनेक्शन दिले आहे. तसेच ज्या भागात पाइपद्वारे गॅसची सोय नाही अशा 100 ते 125 नवीन रेस्टॉरंटना व्यावसायिक जोडण्या देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती ‘एमएनजीएल’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ता खोदण्याच्या परवानगीसह जलद सरकारी मंजुरीमुळे या विस्ताराला पाठिंबा मिळत आहे. आत्तापर्यंत एमएनजीएलने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 2 हजार 500 किलोमीटरचे जाळे उभारले आहे. विस्ताराचा वेग आता वाढत असून, पुढील तीन महिन्यांत पाइपलाइन बसविण्याचे काम सर्वाधिक वेगाने करण्यात येणार आहे. सध्या जरी काही सदनिकाधारकांनीच पीएनजीचा अवलंब केला, तरी संपूर्ण परिसराला सेवा देण्यासाठी या पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर विकसित केल्या जात आहेत. त्यानंतर वापर वाढविण्यासाठी कंपनी घरोघरी जाऊन जनजागृती करण्यासारख्या मोहिमा राबविणार आहे.
उद्योग-व्यवसायांनी आमच्याकडे येण्याऐवजी एमएनजीएल स्वतःहून त्यांच्यापर्यंत पोहचत आहे. त्यासाठी नुकतेच दोनदिवसीय सुविधा शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये 35 औद्योगिक ग््रााहकांनी नवीन जोडणीसाठी नोंदणी केली आहे. गेल्या काही आठवड्यांत 20 हून अधिक उद्योगांना एमएनजीएलशी जोडण्यात आले आहे. त्यातील 10हून अधिक उद्योगांमध्ये गॅसपुरवठा प्रत्यक्ष सुरू केला आहे. ज्या ठिकाणी पाइपलाइनचे जाळे आधीच उपलब्ध आहे, अशा ठिकाणी तातडीने नवीन कनेक्शन देता येणार आहे. पाइपलाइन टाकण्यासाठी रस्त्यांचे खोदकाम करण्याच्या परवानग्यांसह सरकारच्या जलद मंजुरीमुळे या विस्तारकार्याला मोठा हातभार लागत असल्याचे देखील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
एमएनजीएलच्या गॅससाठी घरमालकांचा पुढाकार
शहरात पूर्वी अनेक भाडेकरू एलपीजी सिलिंडरला प्राधान्य देत होते, तर मालक पीएनजीमध्ये गुंतवणूक करण्यास कचरत होते. परंतु, आता बदलत्या परिस्थितीमुळे घरमालक पीएनजीचा अवलंब करण्यास पुढे येऊ लागले आहेत. त्यामुळे भाडेकरूंनाही फायदा होत आहे.
औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांसह औद्योगिक कॅन्टीनला गॅसपुरवठा
एमएनजीएल सध्या पीएमसी, पीसीएमसी, भोसरी, चाकण, तळेगाव आणि हिंजवडीसारख्या प्रमुख औद्योगिक क्षेत्रांमधील 350 हून अधिक औद्योगिक ग््रााहकांना आणि 50 हून अधिक औद्योगिक कॅन्टीनना सेवा देत आहे. गॅस पाइपलाइनची सुविधा उपलब्ध असलेल्या क्षेत्रांमधील ग््रााहकांपर्यंत पोहचण्यासाठी आणि त्यांना साहाय्य करण्यासाठी एमएनजीएलने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन सर्वेक्षण करणे, माहितीपत्रकांचे वाटप करणे आणि ग््रााहक नोंदणी शिबिरांचे आयोजन करणे यांचा समावेश आहे.