पुणे: एकतर्फी प्रेमातून पंधरावर्षीय राष्ट्रीय कबड्डीपटू मुलीवर तब्बल 22 वार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या शुभम ऊर्फ ऋषिकेश बाजीराव भागवत (वय 22) याला न्यायालयाने जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी हा निकाल दिला. बिबवेवाडीतील यश लॉन्समध्ये 12 ऑक्टोबर 2021 रोजी ही घटना घडली होती.
या प्रकरणात खून झालेल्या मुलीच्या चुलतबहिणीने याबाबत बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. मृत मुलगी आठवीत होती. तिने प्रेमास नकार दिल्याने; तसेच फोनवर बोलणे टाळल्याच्या रागातून आरोपीने तिच्यावर चाकूने 22 वेळा वार करून निर्घृण खून केला होता. आरोपीने मुलीचा गळा चिरून तिचे धड शरीरापासून वेगळे केले होते, असे तक्रारीत नमूद आहे.
सरकारपक्षातर्फे युक्तिवाद करताना विशेष सरकारी वकील ॲड. हेमंत झंजाड म्हणाले, हा दुर्मिळातील दुर्मिळ गुन्हा आहे. या प्रकरणात एकूण 12 साक्षीदारांनी साक्ष नोंदविली आहे. त्यापैकी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी आरोपीला न्यायालयात ओळखले असून, निर्भीडपणे साक्ष नोंदविली आहे. मृत मुलगी आई-वडिलांचे एकुलते एक अपत्य होते, असे ॲड. झंजाड यांनी युक्तिवादादरम्यान नमूद केले.
हा खटला दुर्मीळातील दुर्मीळ प्रकरणांच्या श्रेणीत येईल, असे मानणे कठीण होईल. पण सरकारपक्षाच्या म्हणण्यानुसार हा गुन्हा क्रूर होता. शवविच्छेदन अहवालानुसार मुलीच्या मृतदेहावर 25 छेदलेल्या जखमा आढळल्या. या गुन्ह्यासाठी मृत्युदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा अशा दोनच तरतुदी आहेत.
जन्मठेप हा नियम आहे आणि मृत्युदंड हा अपवाद आहे. मृत्युदंडाची शिक्षा देऊन हे अपवादात्मक प्रकरण म्हणून घोषित होणे हे माझ्या न्यायिक मनाला पटत नाही. त्यामुळे जन्मठेपेची शिक्षा ही आरोपीसाठी योग्य शिक्षा आहे, असे निरीक्षण सत्र न्यायाधीश साळुंखे यांच्या न्यायालयाने यावेळी नोंदविले.