Accident file photo
पुणे

Pune Accident: पुण्यात अल्पवयीन चालकाची थार 17 दुचाकींवर आदळली

लोणी काळभोर पोलीस ठाण्यासमोर घडलेल्या घटनेत मोठे नुकसान; सुदैवाने जीवितहानी नाही

पुढारी वृत्तसेवा

पुणे: अल्पवयीन चालकाने आपल्या ताब्यातील थार ही चारचाकी बेदरकारपने आणि हलगर्जीपणाने चालवत लोणी काळभोर पोलिस ठाण्यासमोर उभ्या असलेल्या सतरा दुचाकींना धडक दिली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झालेले नसले, तरी वाहनांचे मात्र 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

याप्रकरणी अल्पवयीन मुलाला थार मोटार चालविण्यासाठी देणाऱ्याविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस हवालदार संतोष तांदळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार थार मालक नवनाथ पंडित सातव (रा. तांबे वस्ती, केसनंद) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवनाथ सातव यांच्या मालकीची असणारी थार ही त्यांनी जवळच्या नात्यातील 17 वर्षीय मुलाला चालवायला दिली होती. अल्पवयीन मुलगा आपल्या तीन मित्रांसह तीर्थक्षेत्र रामदरा येथे दर्शनासाठी आले होते. दर्शन घेऊन परत येत असताना सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर गावातील दत्त मंदिर आणि लोणी फाटा यांच्या दरम्यान असलेल्या लोणी काळभोर पोलीस ठाण्यासमोर आले.

त्या वेळी अल्पवयीन थारचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी पोलिस ठाणे व प्राथमिक आरोग्य केंद्रादरम्यान उभ्या करण्यात आलेल्या दुचाकींना धडकली. यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. परंतु, शासकीय व खासगी अशा एकूण 17 वाहनांना धडक देऊन मोठे नुकसान केले आहे.

वाहनचालक अल्पवयीन असल्याची जाणीव असताना देखील व त्याचेकडे कोणताही कायदेशीर वाहन परवाना नसताना त्याचे ताब्यातील वाहन दिले, या कारणांवरून वाहनमालक नवनाथ सातव यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस अंमलदार नागवडे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT