ATM Pudhari
पुणे

Mini ATM Small Denomination Notes: पुण्यात लवकरच 10, 20, 50 रुपयांच्या नोटांचे मिनी एटीएम

आरबीआयचा पायलट प्रकल्प; सुट्या पैशांच्या समस्येला मिळणार दिलासा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: ‌‘रिक्षाभाडे 70 रुपये झालेय आणि तुम्ही 500 रुपयांची नोट देताय?‌’ अशा संवादानंतर रिक्षावाला आणि प्रवासी यांच्यात होणारी बाचाबाची नवीन नक्कीच नाही. सुट्या पैशांची हीच अडचण बसभाडे, किराणा मालाची खरेदी आणि दैनंदिन जीवनातील सर्व व्यवहारांना लागू होते. मात्र, ही परिस्थिती बदलणार आहे. मुंबईतील काही निवडक ठिकाणी आता एटीएममधून 10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटा मिळण्यास सुरुवात झाली असून, पुण्यातही अशी सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे.

भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) आणि काही बँकांनी छोट्या रकमेच्या नोटा उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेऊन मिनी एटीएम सुरू करण्याची मोहीम हाती घेतली आहे. प्रायोगिक तत्त्वावर त्याची चाचणी (पायलट प्रोजेक्ट) सुरू करण्यात आली असून, त्याची उपयुक्तता स्पष्ट होताच देशभर 10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटांसाठीचे मिनी एटीएम देशभरातील ग््राामीण आणि शहरी भागात उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यामुळे मोठ्या एटीएमवर गर्दी कमी होईल आणि छोट्या व्यवहारांसाठी सोयी वाढतील, असे बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

मिनी एटीएम मशिन्स हे पारंपरिक एटीएमपेक्षा लहान, हलके आणि कमी खर्चाचे आहेत. यांची किंमत केवळ 30,000 ते 50,000 रुपयांपर्यंत असते, तर सामान्य एटीएमची किंमत लाखोंमध्ये असते. अशा प्रकारची एटीएम सौरऊर्जेवरही चालू शकतात, ज्यामुळे ग््राामीण भागात वीज नसली तरी त्यांच्या वापरात अडचण येणार नाही.

रिझर्व्ह बँकेच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, हे मिनी एटीएम आधार कार्ड आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरणावर आधारित आहेत. वापरकर्त्याला केवळ बोटांचा ठसा उमटवून 10, 20 किंवा 50 रुपयांच्या नोटा काढता येतील. अशा व्यवहारासाठी दिवसाला कमाल दोन हजार रुपयांपर्यंतची मर्यादा असणार आहे.

मिनी एटीएमचे फायदे

  • सुट्या पैशांची कटकट संपेल

  • अचूक रक्कम उपलब्ध होईल. 70 रुपये किंवा 120 रुपये हवे असतील तर ते मिळतील.

  • डिजिटल साक्षरता नसलेल्यांना मदत. ज्येष्ठ नागरिक किंवा ज्यांच्याकडे यूपीआय सुविधा नाही त्यांच्यासाठी हे अत्यंत सोयीचे होईल.

  • जन धन खातेधारक, शेतकरी आणि छोटे व्यापारी यांना दैनंदिन व्यवहार आणि व्यापार सुलभतेने करता येतील.

  • कॅशलेस अर्थव्यवस्थेच्या दिशेने सरकारची पावले पडत असली तरीही रोख व्यवहारांसाठी या मिनी एटीएमच्या उपक्रमामुळे सामान्यांचे जीवन सुसह्य होईल.

  • फक्त मोठ्या रकमेचे केंद्र न राहता एटीएम आता सर्वसामान्यांचे पाकीट होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT