Pune Metro Bridge Pudhari
पुणे

Pune Metro Bridge: वाकड स्थानकावर ६० मीटर पादचारी पूल; लास्ट माईल कनेक्टिव्हिटीला गती

मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील वर्दळीत नागरिकांना सुरक्षित रस्ता; मेट्रो लाइन 3 ची अंतिम तयारी पूर्ण

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे आयटी सिटी मेट्रो रेल कॉर्पोरेशनने पुणेरी मेट्रोच्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसह लास्ट माईल कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने वाकड मेट्रो स्थानकावर ६० मीटर लांबीचा पादचारी पूल (फूट ओव्हर ब्रिज) उभारला आहे. मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील अत्यंत वर्दळीच्या वाकड चौकात सोमवारी (दि. २९) पहाटे या पुलाची उभारणी पूर्ण केली. या पुलामुळे मेट्रो स्थानक थेट महामार्गाच्या दुसऱ्या बाजूशी जोडले गेले असून, प्रवाशांना सुरक्षित पादचारी मार्ग उपलब्ध झाला आहे. विशेष म्हणजे, फक्त मेट्रोचे प्रवासीच नव्हे, तर इतर नागरिकांनाही रस्ता ओलांडण्यासाठी या पुलाचा वापर करता येणार आहे.

मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वेगवान वाहतुकीमुळे वाकड चौकातून रस्ता ओलांडणे नागरिकांसाठी मोठे आव्हान ठरत होते. नव्याने उभारलेल्या या पुलामुळे फक्त मेट्रो प्रवाशांनाच नव्हे, तर दररोज या मार्गाचा वापर करणाऱ्या नागरिकांना सुरक्षितपणे महामार्ग ओलांडता येणार आहे.

त्यामुळे या परिसरात अपघाताचा धोका कमी होण्यास मोठी मदत होईल. मेट्रोच्या नागरी अभियांत्रिकी पथकाने सलग दोन रात्री अखंड काम करीत सोमवारी सकाळपर्यंत पुलाची दोन्ही टोके मेट्रो स्थानकाच्या संरचनेशी यशस्वीपणे जोडली. मुंबईसह इतर शहरांतून पुण्यात ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठीही मोठा दिलासा मिळाला आहे.

मेट्रो लाइन ३ ची अंतिम तयारी

पुणे मेट्रो लाइन ३ अर्थात पुणेरी मेट्रोने संपूर्ण २३ किलोमीटर उन्नत मार्गावर यशस्वी एंड-टू-एंड चाचणी पूर्ण केली आहे. त्यामुळे व्यावसायिक सेवेसाठीचा मार्ग मोकळा झाला असून, आता फक्त आवश्यक वैधानिक आणि नियामक मंजुरीची प्रतीक्षा आहे. या मार्गावरील मेट्रो सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात मान ते आर. के. लक्ष्मण संग्रहालय या १३.३ किमी मार्गावरील १२ स्थानके प्रवाशांसाठी खुली करण्यात येतील.

त्यानंतर हा मार्ग जिल्हा न्यायालयापर्यंत वाढवून महामेट्रोच्या सध्या कार्यान्वित असलेल्या नेटवर्कशी जोडला जाईल. संपूर्ण मार्ग सुरू झाल्यानंतर शिवाजीनगर ते हिंजवडी हा प्रवास सध्याच्या दीड तासाऐवजी अवघ्या ४५ मिनिटांत पूर्ण होईल. त्यामुळे प्रवासाचा कालावधी ५० टक्क्यांहून अधिक कमी होऊन पुण्यातील आयटी कर्मचारी, विद्यार्थी आणि दैनंदिन प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT