पुणे: मेट्रोस्थानकांवरील गर्दीचे नियोजन करण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी आता दर पाच मिनिटांनी मेट्रो ट्रेन चालवण्याचे नियोजन करण्यात येत असून, यासाठी आवश्यक असलेली ट्रायल रन (प्रायोगिक चाचणी) नुकतीच यशस्वीरीत्या पार पडली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास मेट्रो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सध्या मेट्रोची सेवा दर सहा मिनिटांनी उपलब्ध आहे. पूर्वी ती दर सात मिनिटांना होती, मध्यंतरीच्या काळात ही सेवा सहा मिनिटांवर आणण्यात आली आहे. मात्र, सकाळी आणि संध्याकाळी पिकअवरला नोकरदार तसेच विद्यार्थ्यांच्या वाढत्या गर्दीमुळे गाड्यांमध्ये प्रचंड ताण येत आहे. या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर गाड्यांमधील वेळेचे अंतर कमी करून ते दर पाच मिनिटांवर आणण्यासाठी महामेट्रोकडून वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत.
ट्रॅक, सिग्नलिंग यंत्रणा, स्थानकांवरील थांब्याच्या कालावधीचे अचूक नियोजन करणार
मेट्रोची फ्रिक्वेन्सी कमी केल्यास ट्रॅक सुरक्षा, सिग्नलिंग यंत्रणा आणि स्थानकांवरील थांब्याचा कालावधी यांचे अचूक नियोजन करावे लागते.
या सर्व तांत्रिक बाबींची तपासणी करण्यासाठी नुकतीच एक विशेष चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली असून, आवश्यक ते तांत्रिक बदल आणि नियोजन पूर्ण झाल्यानंतर या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे.
वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मेट्रो ट्रेन आता दर पाच मिनिटांनी चालवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. नुकतीच यासंदर्भातील ट्रायल आम्ही घेतली आहे. सध्या दर सहा मिनिटांना मेट्रोची ट्रेन धावत आहे, आता त्याची फ्रिक्वेन्सी दर पाच मिनिटांना करण्याचे आमचे नियोजन आहे. लवकरच याबाबत अंमलबजावणी करण्यासाठी नियोजन केले जाईलश्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो.