पुणे: स्वारगेट-कात्रज मेट्रोमार्ग पुढे शिवापूर टोलनाका परिसरातून प्रस्तावित रिंग रोडपर्यंत वाढविण्यासंबंधीच्या मागणीच्या प्रस्तावास शहर सुधारणा समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
भाजपच्या नगरसेविका वर्षा तापकीर यांनी हा प्रस्ताव दिला होता. त्यास मंजुरी देण्यात आल्याचे शहर सुधारणाच्या अध्यक्षा स्मिता वस्ते यांनी सांगितले. दक्षिण पुणे, कात्रज परिसर, तसेच शिवापूर टोलनाका आणि प्रस्तावित रिंग रोडलगत झपाट्याने वाढणारी वसाहत व वाढता वाहतूक ताण लक्षात घेता मेट्रो विस्तार अत्यंत आवश्यक आहे.
या प्रकल्पामुळे नागरिकांना जलद, सुरक्षित व पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे. अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव मुख्य सभेकडे शिफारस केला आहे, अशी माहिती वस्ते यांनी दिली. दरम्यान, सदस्यांच्या मागणीवरून हा प्रस्ताव मंजूर केला. या मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार झालेला नाही. तसेच प्रशासनाकडून त्यावर कार्यवाही झालेली नाही.