Pune Metro Crowd Pudhari
पुणे

Pune Metro Ganeshotsav: गणेशोत्सवात पुणे मेट्रोचा नवा विक्रम; एका दिवसात तब्बल ४ लाख ७८ हजार प्रवाशांचा प्रवास

दर्शन आणि देखावे पाहण्यासाठी पुणेकरांची मेट्रोला पसंती; जिल्हा न्यायालय स्थानकावर ६६,४६१ प्रवाशांनी केला इंटरचेंज

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरात गणेशोत्सवाचा उत्साह सध्या शिगेला पोहचला असून, बाप्पांचे दर्शन आणि देखावे पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रो प्रवाशांच्या सेवेसाठी महत्त्वाची ठरत आहे.

शनिवारी (दि. १९) गणेशोत्सवाच्या काळात पुणे मेट्रोने प्रवासीसंख्येचा नवा उच्चांक गाठला असून, तब्बल ४ लाख ७८ हजार ४७७ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केल्याची अधिकृत माहिती मेट्रो प्रशासनाने जाहीर केली आहे. शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि सुरक्षित, जलद प्रवासाला प्राधान्य देण्यासाठी नागरिकांनी यंदाच्या गणेशोत्सवात मेट्रोला पसंती दिली आहे.

विशेषतः मध्यवर्ती भागातील गर्दीच्या ठिकाणी जाण्यासाठी मेट्रोचा मोठा फायदा प्रवाशांना होत आहे. त्यामुळे इतर दिवशी २ लाखांच्या घरात असलेली रोजची प्रवासीसंख्या गणेशोत्सव काळ आणि शनिवार, रविवार जोडून आलेल्या सुट्यांमुळे ४ लाखांपेक्षा अधिक म्हणजेच ५ लाखांपर्यंत पोहचली आहे.

दोन्ही मार्गिका बदलणारे प्रवासी (इंटरचेंज) म्हणजेच जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकावर एका मार्गिकेतून दुसऱ्या मार्गिकेत प्रवास बदलणाऱ्या प्रवाशांची संख्या ६६,४६१ इतकी नोंदवली गेली. यामुळे या स्थानकावर प्रवाशांची मोठी रेलचेल पाहायला मिळाली.

आगामी काळात आणखी गर्दी वाढणार

गणेशोत्सवादरम्यान भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता पुणे मेट्रो प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सुविधांसाठी चोख व्यवस्था केली होती. रात्री उशिरापर्यंत मेट्रोसेवा सुरू असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मेट्रोच्या या सुविधेमुळे पुणेकरांचा प्रवास अधिक सुखकर झाला असून, आगामी दिवसांमध्येही प्रवासीसंख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT