पुणे: महामेट्रोने ‘व्हॅलेंटाइन डे’चे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड मनपा, शिवाजीनगर आणि स्वारगेट या तीन अत्यंत गजबजलेल्या मेट्रो स्थानकांची अतिरिक्त प्रवेशद्वारे शनिवारपासून (दि. 14) प्रवाशांसाठी खुली केली. या खुल्या झालेल्या प्रवेशद्वारांमुळे मेट्रो प्रवाशांचा प्रवास सोपा झाला आहे. या नवीन सुविधेमुळे प्रवाशांना आता जीवघेणी वाहतूक कोंडी आणि रस्ते ओलांडण्याच्या कसरतीतून सुटका मिळणार आहे.
पुणे-मुंबई महामार्गावर मुंबईच्या दिशेला असलेले पिंपरी-चिंचवड मनपा (प्रवेशद्वार क्र. 3) प्रवेशद्वार खुले झाल्यामुळे पिंपरी शहरातून येणाऱ्या प्रवाशांना आता हायवे ओलांडण्याची गरज राहिली नाही. महापालिकेत जाणाऱ्या नागरिकांसाठी ही मोठी सोय ठरणार आहे. तसेच स्वारगेट मेट्रो स्थानक (प्रवेशद्वार क्र. 5) भुयारी प्रवेशद्वार थेट एसटी स्टँडच्या बाजूला उघडले आहे.
यामुळे एसटी प्रवासी आता गर्दीत न अडकता थेट या भुयारी प्रवेशद्वाराने स्वारगेट मेट्रो स्थानकात जात आहेत. परिणामी, एसटी प्रवाशांना थेट मेट्रो प्रवासासाठी जाणे सोपे झाले आहे. आकाशवाणी केंद्राजवळ (शिमला ऑफिस चौक) येथील हे भुयारी (शिवाजीनगर मेट्रो स्थानक प्रवेशद्वार क्र. 3) प्रवेशद्वार सुरू झाल्याने गणेशखिंड रस्ता आणि कृषी महाविद्यालयाच्या बाजूने येणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. शनिवारपासून पुणेकर मेट्रो प्रवाशांनी या तिन्ही मेट्रो स्थानकांतून प्रवास केला.
मेट्रो प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन आम्ही ही नवीन प्रवेशद्वारे सुरू करीत आहोत. यामुळे विशेषत: मुख्य रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना रस्ते ओलांडण्याचा त्रास होणार नाही आणि त्यांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल.श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो