Metro  Pudhari
पुणे

Pune Metro Expansion: पुणे मेट्रो विस्ताराला वेग; वनाज-चांदणी चौक, रामवाडी-वाघोली मार्ग 2028 पर्यंत पूर्ण

वाघोली-विमाननगर डबलडेकर उड्डाणपूलाची योजना; वाहतूक कोंडीला दिलासा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे शहराच्या पूर्व-पश्चिम भागाला जोडणाऱ्या एका लाईन मेट्रोमार्गिकाचा विस्तार आता खऱ्या अर्थाने गती घेणार आहे. वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडीपर्यंत) या विस्तारित मार्गांचे काम पुढील अडीच वर्षांत म्हणजेच 2028 च्या मध्यापर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ‌‘महामेट्रो‌’ने ठेवले आहे.‌‘महामेट्रो‌’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

वाघोली ते विमाननगरदरम्यान डबलडेकर उड्डाणपूल

पुणे-नगर रस्त्यावरील भीषण वाहतूक कोंडीचा विचार करता, रामवाडी ते विठ्ठलवाडी हा विस्तार अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या मार्गाचे सर्वात मोठे वैशिष्ट्‌‍य म्हणजे वाघोली ते विमाननगरदरम्यान रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) डबलडेकर उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याकरिता निविदा प्रक्रियेचे काम सुरू असून, महिनाभरात काम पूर्ण होतील. यामुळे मेट्रो आणि रस्ते वाहतूक अशा दोन्ही स्तरांवर प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार असून, वाघोलीकरांना तासनतास चालणाऱ्या कोंडीतून मोठा दिलासा मिळेल.

असे असेल स्थानकांचे जाळे...

वनाज ते चांदणी चौक विस्तारादरम्यान वाढणारी मेट्रोस्थानके या मार्गावर केवळ 2 स्थानके असतील.

1) कोथरूड बस डेपो, 2) चांदणी चौक

रामवाडी ते विठ्ठलवाडी विस्तारादरम्यान वाढणारी स्थानके

या मार्गावर एकूण 11 स्थानके नियोजित आहेत. यात प्रामुख्याने विमाननगर, सोमनाथनगर, खराडी बायपास, तुळजाभवानी, उबाळेनगर, अप्पर खराडी रोड, वाघेश्वर मंदिर, वाघोली, सिद्धार्थनगर, बकोरी फाटा आणि विठ्ठलवाडी यांचा समावेश आहे.

सध्या वनाज ते रामवाडीदरम्यान मेट्रोची सेवा सुरू आहे. या मूळ मार्गांच्या दोन्ही टोकांकडील विस्ताराचे फक्त भूमिपूजन बाकी असून, त्यानंतर प्रत्यक्ष कामाला वेग दिला जाईल. पुढील अडीच वर्षे अत्यंत महत्त्वाची असून, सन 2028च्या मध्यापर्यंत एका लाईनचा हा विस्तार पुणेकरांच्या सेवेत दाखल होईल.
श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT