PM Modi Pune Metro Pudhari
पुणे

PM Modi Pune Metro: पुणेकरांचा मेट्रो प्रवास होणार आणखी सोपा! मोदींच्या हस्ते नव्या मार्गिकेचे उद्घाटन, मेट्रो आता किती किलोमीटर धावणार?

Narendra Modi Pune Speech: पुणे मेट्रोच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्याच्या विकासासह देशातील मेट्रो विस्तार आणि रोजगारनिर्मितीवर भाष्य केले.

Rahul Shelke

PM Modi Pune Metro: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना मेट्रोचे गिफ्ट देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहराच्या विकासासोबतच शेतकरी, रोजगार आणि गरिबीच्या प्रश्नांवर भाष्य केले. पुण्याने नेहमीच समाजाला नवी दिशा दिली आहे. आता हेच पुणे विकसित भारताच्या वाटचालीला गती देत आहे, असे मोदी म्हणाले. पुणे मेट्रोच्या नव्या टप्प्याच्या लोकार्पण आणि विस्तारीकरणाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मराठीतून पुणेकरांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या.

मोदी म्हणाले, "दिवाळी अगदी जवळ आली आहे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!" मराठीतून शुभेच्छा देत त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. पुण्याचा विकास हा केवळ एका शहरापुरता मर्यादित नसून तो विकसित भारताच्या उद्दिष्टाला बळ देणारा आहे, असे त्यांनी सांगितले.

शहराचा विकास झाला की उत्पादन वाढते. उत्पादन वाढले की प्रगतीला चालना मिळते आणि त्यातून गरिबीची दरी कमी होण्यास मदत होते, असे मोदी यांनी स्पष्ट केले. पुण्यात मेट्रोचे जाळे विस्तारत असल्याने शहराच्या विकासाला नवी दिशा मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

'जुन्या सरकारच्या काळात मेट्रोसाठी आणखी दशके लागली असती'

पुण्यातील मेट्रो प्रकल्पाचा उल्लेख करताना मोदी यांनी पूर्वीच्या सरकारच्या कामकाजावर टीका केली. ते म्हणाले, "आज जुने सरकार आणि जुनी व्यवस्था असती, तर पुण्यात मेट्रो धावण्यासाठी आणखी कितीतरी दशके लागली असती." केंद्र सरकारच्या काळात देशात मेट्रोचा विस्तार वेगाने झाला आहे. आज देशात सुमारे 1,200 किलोमीटर मार्गावर मेट्रो धावत असून, 26 शहरांमध्ये एक कोटींहून अधिक नागरिक दररोज मेट्रोने प्रवास करत आहेत, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात मेट्रोमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. सार्वजनिक आणि खासगी भागीदारीच्या (पीपीपी) माध्यमातून मेट्रो प्रकल्प उभारले जात आहेत. यामुळे देशाच्या विकासाला आणखी गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

'आता भारत गरिबीवर मात करत आहे'

देशातील गरिबीच्या प्रश्नावर बोलताना मोदी यांनी पूर्वीच्या आणि आताच्या परिस्थितीची तुलना केली. ते म्हणाले, "पूर्वी गरिबी हटवण्याचे नारे दिले जात होते. मात्र, आज भारत गरिबीवर मात करत आहे." पूर्वी सरकारी योजनांमधील भ्रष्टाचारामुळे सामान्य नागरिकांचा पैसा अडकून राहत होता. आता योजनांचा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पोहोचत आहे, असे त्यांनी सांगितले.

सरकारमध्ये काम करताना आपल्याला 25 वर्षे पूर्ण झाल्याचा उल्लेखही त्यांनी केला. मुख्यमंत्री असताना गरीब कल्याणाच्या योजना राबवून गरिबी दूर करण्याचा संकल्प केला होता. आजही आपण त्याच धोरणानुसार काम करत असल्याचे मोदी म्हणाले.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोदींचा मराठीतून दिलासा

पुण्यातील कार्यक्रमात पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडेही लक्ष वेधले. विकसित भारताच्या उभारणीत शेतकऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची आपल्याला पूर्ण कल्पना असल्याचे सांगत मोदी म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात जलसंधारणाच्या योजना राबवण्यात आल्या आहेत. राज्य सरकारनेही शेतकऱ्यांना मदत केली आहे. शेतकऱ्यांनी काळजी करू नये, केंद्र सरकार त्यांच्या पाठीशी आहे, असा विश्वास त्यांनी दिला.

सण-उत्सव साजरे करताना शेतकऱ्यांना विसरू नका, असे आवाहनही मोदी यांनी केले. शेतकऱ्यांना त्यांच्या अडचणींतून बाहेर काढण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने हातभार लावला पाहिजे, असे ते म्हणाले.

पुणे मेट्रोच्या विस्तारामुळे प्रवास आणखी सोपा होणार

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे मेट्रोच्या विस्ताराची माहिती दिली. दिवाळीपूर्वी पुणेकरांना मेट्रोचे गिफ्ट मिळत असल्याबद्दल त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारचे आभार मानले. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले होते. आता मेट्रोच्या नव्या टप्प्याचे लोकार्पण आणि विस्तारीकरणाचे भूमिपूजन होत असल्याचे त्यांनी सांगितले.

नव्या मार्गांमुळे पुणेकरांना मेट्रोने सुमारे 55 किलोमीटरचा प्रवास करता येणार आहे. आज भूमिपूजन होत असलेल्या मार्गांमुळे आणखी 46 किलोमीटरची भर पडणार आहे. त्यामुळे भविष्यात मेट्रोचे जाळे 100 किलोमीटरपर्यंत पोहोचेल. त्यानंतर आणखी 50 किलोमीटरने मेट्रोचा विस्तार करण्याचे नियोजन असल्याचे मोहोळ यांनी सांगितले. मागील सत्ताधाऱ्यांनी राजकारणाला प्राधान्य दिले, तर महायुती सरकारने पुण्याच्या भविष्याचा विचार केला, अशी टीकाही त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT