पुणे: बजाज ग््राँड टूर सायकल स्पर्धेसाठी शुक्रवारी (दि. 23) शहरातील अनेक प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. अशा परिस्थितीत रस्त्याने प्रवास करणे अशक्य असताना पुणे मेट्रोने एका गंभीर वैद्यकीय सुविधेसाठी महत्त्वाची भूमिका बजावली. एका रुग्णालयामधील रक्ताचे नमुने गरवारे ते वनाज स्टेशन यादरम्यान एका अत्यंत गंभीर असलेल्या रुग्णासाठी पोहचवायला मदत केली. रक्ताचे नमुने वेळेत आणि सुरक्षितपणे पोहचल्यामुळे रुग्णाला जीवदान मिळाले.
रुग्णालयाच्या तातडीच्या गरजेनुसार रक्ताचे नमुने एका केंद्रातून दुसऱ्या केंद्रात पोहचविणे आवश्यक होते. रस्ते बंद असल्यामुळे रुग्णालय प्रशासनाने मेट्रोचा पर्याय निवडला अन् मेट्रो प्रशासनाकडे तातडीची मदत मागितली, क्षणाचाही विलंब न करता मेट्रो प्रशासनाने सर्व यंत्रणा कामाला लावत, रुग्णालयाच्या कर्मचाऱ्याला वेळेत पोहचविण्यासाठी मदत केली, यामुळे अत्यंत गंभीर असलेल्या रुग्णाला गोल्डन अवरमध्ये मदत झाली.
रुग्णालयाचे कर्मचारी अक्षय कोलते यांनी हे रक्ताचे नमुने घेऊन मेट्रोने प्रवास केला. या वेळी मेट्रो स्थानकावरील कर्मचारी आणि रुग्णालयाचा स्टाफ यांच्यात कमालीचा ताळमेळ पाहायला मिळाला. रस्ते वाहतुकीचा कोणताही अडथळा न येता, मेट्रोच्या वेगवान सुविधेमुळे हे रक्ताचे नमुने वेळेत पोहचविण्यात यश आले. पुणे मेट्रो ही फक्त प्रवासाचे साधन नसून, आणीबाणीच्या काळात ती शहराची लाइफलाइन म्हणून कशी धावून येते, याचेच एक उत्तम उदाहरण शुक्रवारी दुपारच्या सुमारास पाहायला मिळाले.
या गर्दीतही मेट्रोने आपले वेळापत्रक सांभाळत या वैद्यकीय कामाला प्राधान्य दिले. यामुळे रक्ताचे नमुने खराब न होता किंवा उशीर न होता योग्य ठिकाणी पोहचले, त्यामुळे पुढचे उपचार वेळेत करणे शक्य झाल्याचे समोर आले.
पुणे मेट्रो ही नेहमीच पुणेकरांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे. शहरातील रस्त्यांवर शुक्रवारी (दि. 23) मोठ्या प्रमाणात गर्दी आणि निर्बंध होते, हे आम्हाला ठाऊक होते. जेव्हा सह्याद्री हॉस्पिटलच्या टीमने रक्ताचे नमुने घेऊन प्रवास करण्याबाबत कळविले तेव्हा आमच्या स्टेशन स्टाफला तत्काळ सूचना देण्यात आल्या. अशा वैद्यकीय तातडीच्या वेळी मेट्रोचा उपयोग होणे, हे आमच्यासाठी समाधानकारक आहे. मेट्रो ही अडथळाविरहित आणि वेगवान सेवा देत राहील, याची आम्ही खात्री देतो. मेट्रो स्टाफ आणि सह्याद्री हॉस्पिटलच्या टीमचे आम्ही अभिनंदन करतो.चंद्रशेखर तांबवेकर, अतिरिक्त महाव्यवस्थापक, महामेट्रो