शंकर कवडे
पुणे: गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी राज्यासह परराज्यांतून मटार, हिरवी मिरची, ढोबळी मिरची, घेवडा, टोमॅटो, भेंडी आणि वांग्याची मोठी आवक झाली. मागणीच्या तुलनेत आवक जास्त राहिल्याने या फळभाज्यांच्या भावात गत आठवड्याच्या तुलनेत दहा टक्क्यांनी घसरण झाली. उर्वरित फळभाज्यांच्या मागणी आणि पुरवठ्यात समतोल राहिल्याने त्यांचे दर स्थिर होते.
राज्यातील मटारचा हंगाम बहरल्याने पुरंदर, पारनेर, वाई आणि सातारा भागातून आवक दुपटीने वाढली. पुण्यासह राज्यातील विविध बाजारपेठांमध्ये टोमॅटोची आवक वाढल्याने पुण्यातून होणाऱ्या मागणीवरही परिणाम झाला. रक्षाबंधनामुळे शेतमालाची तोड कमी झाल्याने रविवारी सुमारे ९० ट्रक शेतमाल दाखल झाला. ही आवक गत आठवड्याच्या तुलनेत दहा ट्रकने कमी राहिल्याची माहिती ज्येष्ठ अडतदार विलास भुजबळ यांनी दिली.
परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून हिरवी मिरची १८ ते २० टेम्पो, कर्नाटक येथून कोबी ३ ते ४ टेम्पो, आंध्र प्रदेश व तमिळनाडू येथून शेवगा २ ते ३ टेम्पो, इंदूर येथून गाजर १० ते १२ टेम्पो, कर्नाटकातून घेवडा २ ते ३ टेम्पो, गुजरात आणि कर्नाटकातून भुईमूग शेंग ३ ते ४ टेम्पो, कर्नाटक येथून पावटा २ टेम्पो, तामिळनाडू येथून तोतापुरी कैरी ४० क्रेट, मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे १० ते १२ टेम्पो, इंदूर, आग्रा येथून बटाटा ४० टेम्पो इतकी आवक झाली.
स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे ४५० ते ५०० गोणी, भेंडी ६ ते ७ टेम्पो, गवार ३ ते ४ टेम्पो, टोमॅटो ८ ते १० हजार क्रेट्स, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, शेवगा २ ते ३ टेम्पो, मटार ३०० गोणी, पावटा १ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, घेवडा २, कांदा सुमारे ५० ते ६० टेम्पो इतकी आवक झाली.
पालेभाज्यांचे भाव स्थिर
मार्केट यार्डातील घाऊक बाजारात बहुतांश पालेभाज्यांची आवक रविवारी वाढली. त्याचबरोबर मागणीही चांगली राहिल्याने पालेभाज्यांचे भाव स्थिर होते. बाजारात कोथिंबिरीची अडीच लाख जुडी, तर मेथीची ५० हजार जुडी आवक झाली. गत आठवड्याच्या तुलनेत कोथिंबिरीची आवक ५० हजार गड्ड्यांनी वाढली, तर मेथीची आवक ५० हजार गड्ड्यांनी कमी राहिली. घाऊक बाजारात पालेभाज्यांच्या गड्डीला ३ ते १५ रुपये भाव मिळाला. तर, किरकोळ बाजारात ५ ते २५ रुपये दराने विक्री सुरू आहे.