Pune Market Yard Parking Pudhari
पुणे

Pune Market Yard Parking: पुणे मार्केट यार्डात ‘पार्किंग ट्रॅप’; फलक नसतानाही वाहने उचलून शुल्क वसुली?

पोलिस ठाणे, पेट्रोल पंप परिसरातील वाहनांवरही कारवाई; ठेकेदाराच्या मनमानीविरोधात वाहनचालकांचा संताप

पुढारी वृत्तसेवा

पुणे: नो-पार्किंगचा फलक नाही, वाहन पार्किंगला मनाई असल्याची कोणतीही सूचना नाही; तरीही वाहन उचलायचे आणि नंतर ‘नो-पार्किंग’च्या नावाखाली शुल्क वसूल करायचे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डातील ठेकेदाराचा असा ‘पार्किंग ट्रॅप’ सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. या मनमानीमुळे बाजारात खरेदी तसेच विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना आर्थिक भुर्दंडासह मनस्ताप सहन करावा लागत आहे.

गुलटेकडी मार्केट यार्ड परिसरातील पोलिस स्टेशन तसेच पेट्रोल पंप परिसरात नो-पार्किंगचा फलक नसलेल्या तसेच पार्किंगसाठी वापरल्या जाणाऱ्या आतील जागांमधूनही वाहने उचलली जात आहेत. विशेष म्हणजे, बाजार समिती आवारातील पोलिस ठाण्यात कामानिमित्त आलेल्या नागरिकांची वाहनेही उचलून त्यांच्याकडून शुल्क वसूल केले जात आहे. असाच काहीसा प्रकार पेट्रोल पंप तसेच मुख्य प्रवेशद्वाराबाहेरही घडत आहे. जाळीवर दुचाकी पार्किंगचा मोठा बोर्ड लावायचा आणि त्याच्या बाजूला नो पार्किंगचा छोटा बोर्ड लावून जाळीमध्ये लावलेली वाहने उचलायची असा बाजार समितीच्या ठेकेदाराकडून सुरू आहे.

शहरात वाहतूक पोलिसांकडून नो-पार्किंगमधील वाहन उचलण्यापूर्वी संबंधित वाहनाचा फोटो काढला जातो. त्यामुळे वाहन नेमके कुठे आणि कोणत्या परिस्थितीत उभे होते, याचा पुरावा राहतो. मार्केट यार्डात मात्र वाहन उचलताना अशी पारदर्शक प्रक्रिया राबवली जात नाही. ठेकेदाराच्या या कारभाराकडे बाजार समिती प्रशासनाचे दुर्लक्ष का होत आहे, असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे. प्रशासनाने ठेकेदाराला दिलेल्या परवानगीची व्याप्ती स्पष्ट करून नियमबाह्य पद्धतीने वाहन उचलून शुल्क वसूल केले जात असल्यास संबंधितांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

मी कामानिमित्त मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात आलो होतो. काम आटोपून खाली आल्यानंतर माझी गाडी जागेवर दिसली नाही. परिसरात शोध घेतल्यानंतर एका व्यक्तीने गाडी उचलून नेल्याचे सांगितले. मात्र, मी गाडी लावलेल्या ठिकाणी ‘नो पार्किंग’चा कोणताही फलक नव्हता. तसेच, गाडी उचलल्यानंतर ती कोठे नेली, याबाबतही कोणतीही सूचना लावलेली नव्हती. त्यानंतर मी गाडी सोडवून घेतली; मात्र त्याची कोणतीही पावती मला दिली नाही. पोलिस ठाण्याच्या आवारातूनच गाडी का उचलली, अशी विचारणा केली असता, ‘पोलिसांनीच गाडी उचलण्यास सांगितले,’ असे संबंधित कामगारांनी सांगितले. त्यामुळे हे ठेकेदार नेमके बाजार समितीचे आहेत की पोलिसांचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अमोल क्षीरसागर, वाहनचालक
शिवनेरी रस्त्यावर पूर्वी ‘पे अँड पार्क’ची सुविधा होती. मात्र, आता संपूर्ण रस्ता ‘नो पार्किंग’ केला आहे. असे असतानाही जुने ‘पे अँड पार्क’चे फलक कायम ठेवून वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण करणे योग्य नाही. हे फलक तातडीने काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पार्किंगबाबत चुकीची माहिती देऊन अथवा वाहनचालकांची गैरसोय करून वाहने उचलली जात असतील, तर ती बाब गंभीर आहे. याबाबत संबंधित ठेकेदाराला सक्त ताकीद देण्यात येईल. वाहनचालकांनी अशा प्रकाराबाबत थेट बाजार समितीकडे तक्रार करावी. तसेच परिसरातील जाळ्या काढणे अथवा त्या योग्य पद्धतीने बंदिस्त करण्यासह आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात येतील.
डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT