पुणे: गुजरातमधील चिक्कूचा हंगाम सुरू झाल्याने मार्केट यार्डातील फळबाजारात चिक्कूची आवक वाढू लागली आहे. रविवारी सुमारे ५०० डागांमधून चिक्कूची आवक झाली. गुजरातखेरीज कर्नाटक आणि राज्याच्या विविध भागांतूनही तुरळक आवक होत आहे.
मागणीच्या तुलनेत आवक जास्त असल्याने चिक्कूच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली. रविवारी घाऊक बाजारात दहा किलोला १०० ते ६०० रुपये भाव मिळाला. तर, किरकोळ बाजारात ८० ते १२० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे.
बेसुमार तोडीमुळे लिंबाची घटलेली आवक कायम आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी वाढल्याने १५ ते २० किलोच्या गोणीमागे १०० ते १५० रुपयांची वाढ झाली आहे. सीताफळाच्या भावातही दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे, मागणी कमी असल्याने खरबुजाच्या भावात किलोमागे दोन रुपयांची घसरण झाली. उर्वरित फळांचे दर गत आठवड्याच्या पातळीवर स्थिर राहिल्याचे सांगण्यात आले.
फळबाजारात रविवारी (दि. ३०) लिंबू ८०० ते १००० गोणी, मोसंबी ५० ते ६० टन, संत्रा ४ ते ५ टन, डाळिंब १३० ते १४० टन, पपई २० ते २५ टेम्पो, कलिंगड १० ते १२ गाड्या, खरबूज २ ते ३ टेम्पो, चिक्कू ४०० ते ५०० डाग, पेरू ४०० ते ६०० क्रेट, पिअर ५ गाड्या, सीताफळ १० ते १२ टन आणि अननसाची ५ ट्रक इतकी आवक झाली होती.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : ५०० ते २०००, मोसंबी : (३ डझन) : ११०-२५० (४ डझन) : ३०-१००, संत्रा : (१० किलो) : १५०-७००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ५०-१४०, आरक्ता : १०-५०, गणेश : ५-३०, कलिंगड : ८-१०, खरबूज : १५-२५, पपई : २५-३५, चिक्कू (दहा किलो) : १००-६००, पेरू (२० किलो) : ४००-६००, अननस (१ डझन) : ४००-९००, सीताफळ (१ किलो) : २०-१५०, पिअर (२४ ते २५ किलो) : ३५००-४०००.