बिबवेवाडी: यार्ड परिसरात सध्या ठिकठिकाणी आंबा महोत्सव सुरू आहे. तसेच शिवनेरी पथ, मार्केट यार्ड पोस्ट ऑफिस परिसर आणि नेहरू रस्त्यावरील पीएमपी डेपो शेजारी देखील आंबा विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. यामुळे परिसरात कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताणही वाढत आहे. रस्त्यांशेजारी आंब्यांचे स्टॉल लावल्याने वाहतूक कोंडीत भरही पडत आहे.
परिसरातील रस्त्यांच्या देखभाल, दुरुस्तीचे काम महापालिकेचे आहे, तर कायदेशीर हक्क पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकडे आहे. प्रशासनातील समन्वयाच्या अभावी या भागातील रस्त्यांची अनेक वेळा स्वच्छ केला जात नाही. त्यातच या रस्त्यांच्या कडेला सध्या आंबे विक्रेते मोठ्या प्रमाणात कचरा टाकत आहेत.
मार्केट डेपो शेजारील रस्त्यावर पिशव्यांमध्ये सडलेले आंबे आणि इतर कचरा टाकला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. परिणामी, महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे. या कचऱ्याचा त्रास रहिवासी, व्यापारी, वाहनचालक आणि पादचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. महापालिका आणि कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाचे परिसराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
रस्त्यांच्या कडेला आंबे विक्रेत्यांनी दुकाने थाटल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे. कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी, या भागातील रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. महापालिका आणि बाजार समिती प्रशासनाने परिसरात कचरा नियमित उचलावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
आंबा महोत्सवामुळे मार्केट यार्ड आणि पीएमपी डेपो परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. तसेच आंबे विक्रेते रस्त्यांवरच कचरा टाकत असल्याने रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका आणि बाजार समिती प्रशासनातील समन्वयाच्या अभावामुळे परिसरात विविध समस्या निर्माण झाल्या आहे.सुरेश चौधरी, रहिवासी, मार्केट यार्ड परिसर
आंबा महोत्सवामुळे मार्केट यार्ड परिसरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाशी पत्रव्यवहार करून लवकरच हा प्रश्न सोडवला जाईल.शीतल वाकडे, सहायक आयुक्त, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय