पुणे: भर दिवसा पाच जणांनी हवाल्याचे ३० लाख रुपये लुटल्याची घटना मार्केट यार्ड परिसरात घडली. मात्र, तक्रारदाराने मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात धाव घेतल्यानंतर दरोड्याचा गुन्हा दाखल न करता केवळ प्रॉपर्टी मिसिंगची तक्रार नोंदवून त्यांची बोळवण करण्यात आली. स्वारगेट पोलिसांनी लुटमारीच्या प्रकरणात काही आरोपींना पकडल्यानंतर त्यांनी मार्केट यार्डमधील दरोड्याची कबुली दिली. या प्रकाराची पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गंभीर दखल घेतली असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
दि. ७ ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वाच्या सुमारास श्रवण देवासी आणि गणपत देवासी हे दोघे दुचाकीवरून ३० लाख रुपये असलेली बॅग घेऊन जात होते. ते राकेश परिहारीया यांच्या एस. पी. एन्टरप्रायजेसमध्ये नोकरीला असून, ही रक्कम हवाल्याची होती. शिवनेरी रोड, मार्केट यार्ड येथे दोघांनी त्यांच्या दुचाकीला आडवी दुचाकी लावली. त्यातील एकाने श्रवण आणि गणपत यांच्या तोंडावर स्प्रे मारला. डोळ्यांची आग होऊ लागल्याने दोघे दुचाकी सोडून खाली पडले.
त्याचवेळी दुसऱ्या दुचाकीवरून आलेल्या तिघांनी पैशांची बॅग हिसकावून पळ काढला. घटनेची माहिती मालक राकेश यांना देण्यात आली. त्यांनी मार्केट यार्ड पोलिसांना कळवल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक अक्षयकुमार गडगडे आणि कर्मचारी जाधव घटनास्थळी आले. त्यानंतर सर्वांना पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. तक्रार लिहून घेतल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे तपासून गुन्हा दाखल करू, असे सांगण्यात आले.
मात्र, अनेकदा पाठपुरावा करूनही दरोड्याचा गुन्हा दाखल झाला नाही. ९ ऑक्टोबर रोजी केवळ प्रॉपर्टी मिसिंगची नोंद करण्यात आली. दरम्यान, स्वारगेट पोलिसांनी त्यांच्या हद्दीतील लुटमारीच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात दोघांना पकडले. चौकशीत त्यांनी मार्केट यार्ड परिसरात स्प्रे मारून ३० लाख रुपये लुटल्याचे सांगितले. त्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला.
कर्तव्यात कुचराई केल्याचा ठपका
दखलपात्र गुन्ह्याची तक्रार घेऊन कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित असताना तक्रारदाराला घरी पाठवून दिल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. प्रभारी अधिकारी विश्वजित जगताप आणि उपनिरीक्षक अक्षयकुमार गडगडे यांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करून कर्तव्यात कुचराई केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या दोघांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.