Pune Latest Vegetables Price Today
पुणे: लसणाचा हंगाम बहरल्याने बाजारात मध्य प्रदेशातून लसणाची आवक वाढली आहे. याखेरीज राज्यासह परराज्यांतून घेवडा व शेवगा मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. बाजारात आवक होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी कमी असल्याने त्याच्या दरात दहा ते वीस टक्क्यांनी घसरण झाली आहे.
याउलट फ्लॉवरचे दर दहा टक्क्यांनी वधारल्याचे सांगण्यात आले. पावसाने उघडीप दिल्यानंतर गुलटेकडी मार्केट यार्ड येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी विभागात फळभाज्यांची आवक वाढली आहे. गत आठवड्याच्या तुलनेत परराज्यांसह जिल्ह्यातून आवक दहा ते वीस ट्रकने वाढून शंभर ट्रकपर्यंत पोहचली. (Latest Pune News)
परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये कर्नाटक आणि गुजरात येथून कोबी 4 ते 5 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा 4 ते 5 टेम्पो, इंदूर येथून गाजर 10 ते 12 टेम्पो, कर्नाटक, गुजरात आणि उत्तर प्रदेशातून हिरवी मिरची 8 ते 10 टेम्पो, गुजरात व कर्नाटकातून घेवडा 3 ते 4 टेम्पो, हिमाचल प्रदेश येथून 2 टेम्पो मटार, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून कैरी 2 टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे 10 ते 12 टेम्पो तर इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा 35 ते 40 टेम्पो आवक झाली होती.
स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे 500 ते 600 गोणी, भेंडी 6 ते 7 टेम्पो, गवार 4 ते 5 टेम्पो, टोमॅटो 8 ते 10 हजार क्रेट, हिरवी मिरची 4 ते 5 टेम्पो, काकडी 6 ते 7 टेम्पो, फ्लॉवर 7 ते 8 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, ढोबळी मिरची 8 ते 10 टेम्पो, भुईमूग शेंग 100 ते 125 गोणी, तांबडा भोपळा 14 ते 15 टेम्पो, कांदा सुमारे 70 ते 80 टेम्पो इतकी आवक झाली होती.
कोथिंबीर स्वस्त; अन्य पालेभाज्या कडाडलेल्याच
पावसाने उघडीप दिल्यानंतर बाजारात पालेभाज्यांची आवक वाढली आहे. मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी कोथिंबिरीची दीड लाख जुडी, तर मेथीची 50 हजार जुडींची आवक झाली. गत आठवड्याच्या तुलनेत कोथिंबिरीची आवक 50 हजार, तर मेथीची आवक दहा हजार जुडींनी वाढली.
मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने कोथिंबीर, मेथी, कांदापातीसह सर्व प्रकारच्या पालेभाज्यांच्या भावात पाच ते दहा टक्क्यांनी घसरण झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, किरकोळ बाजारात कोथिंबीर वगळता अन्य पालेभाज्यांचे भाव चढेच आहेत. घाऊक बाजारात एका जुडीची 3 ते 12 रुपये, तर किरकोळ बाजारात 5 ते 50 रुपये दराने विक्री सुरू आहे.