प्रसाद जगताप
पुणे: मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे आकाश रंगीबेरंगी पतंगांनी भरून जात आहे. मात्र उडणाऱ्या या पतंगांसोबत असणारा मांजा अनेक पादचारी, वाहनचालकांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही छुप्या मार्गाने विक्री होणारा चायनीज किंवा नायलॉन मांजा निष्पाप पुणेकरांसाठी आणि मुक्या पक्ष्यांसाठी यमदूत ठरू पाहत आहे.
गत काही वर्षांतील आकडेवारी पाहिली, तर नायलॉन मांजामुळे गळा कापला गेल्याने अनेक दुचाकीस्वारांना आपला जीव गमवावा लागला. कित्येक जण गंभीर जखमी होऊन कायमचे अपंग झाले आहेत. अनेक पक्षी या मांज्यात अडकून रक्ताळलेल्या अवस्थेत खाली कोसळत आहेत. नायलॉन मांजा हा विघटनशील नसल्याने तो अनेक महिने झाडाझुडपांत, तारांवर अडकून राहतो आणि भविष्यातील अपघातांना निमंत्रण देतो. नुकत्याच अशा काही घटना घडल्या आहे. त्यामुळे मुलांवर लक्ष द्या, मुलांना योग्य सूचना द्या, आपला सणोत्सवातील आनंद दुसऱ्याचे मरण ठरू देऊ नका, असे आवाहन पुणेकर नागरिक आणि पक्षीमित्रांनी केले.
नायलॉन मांजाबाबत विशेष मोहीम हाती घ्या!
वाढते धोके लक्षात घेता, पुणेकर आता आक्रमक झाले आहेत. पुणे पोलिस प्रशासनाने फक्त नायलॉन मांजा बंदीचे आदेश न काढता प्रत्यक्ष मैदानात उतरून कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. शहरातील छुप्या पद्धतीने विक्री होणारी दुकाने शोधून त्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी पक्षीमित्र आणि पुणेकरांकडून केली जात आहे.
रोज ऑफिसला पुलावरून जाताना सतत भीती वाटते की, कुठून मांजा येईल आणि गळ्याला लागेल. प्रशासनाने फक्त बंदीचा कागद नाचवू नये, तर जो विक्रेता हा मांजा विकताना सापडेल, त्याचे दुकान कायमचे सील करावे. आपला सण कोणाच्या घरचा दिवा विझवणारा नसावा, तसेच पालकांनीही मुलांना याबाबत कडक सूचना द्याव्यात.अविनाश पानसरे, कर्मचारी व दुचाकीस्वार
संक्रांतीच्या काळात मांजाने पक्षी जखमी झाल्याचे शेकडो कॉल आम्हाला येतात. घटनास्थळी जाऊन पाहिल्यानंतर अनेक पक्ष्यांचे पंख कापले गेल्याचे तर अनेक पक्षी गंभीर जखमी झाल्याने मृत्युमुखी पडल्याचे दिसतात. मागील जवळपास 25 वर्षांपासून मांजामध्ये अडकलेल्या पक्ष्यांना सोडवण्याचे, त्यांना वाचवण्याचे काम निःस्वार्थपणे आम्ही करीत आहोत. नायलॉन मांजा हा निसर्गासाठी शाप आहे, हा संदेश आम्ही विविध माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. मात्र, काहीही फरक पडत नाही. पुणेकर पालकांनी आपल्या मुलांना साधा सुती मांजा वापरण्यास प्रवृत्त केले पाहिजे, यासोबतच माजांमुळे काय होऊ शकते, याबाबत जनजागृती केली पाहिजे.बाळासाहेब ढमाले, पक्षीप्रेमी व सामाजिक कार्यकर्ते
पतंग उडवा, पण माणुसकी हरवू देऊ नका. जर तुम्हाला कुठेही नायलॉन मांजा विक्री होताना दिसली, तर तत्काळ पोलिसांना कळवा. आपला एक छोटासा पुढाकार कोणाचे तरी प्राण वाचवू शकतो. लक्षात ठेवा, पंतग काटलंय हे ओरडण्यात आनंद असावा, कोणाचे आयुष्य कापण्यात नाही. त्यामुळे याबाबतची माहिती पोलिसांना तत्काळ द्यावी.कुणाल चव्हाण, दुचाकीस्वार