पुणे: महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत तोंडाच्या शस्त्रक्रियेसह संबंधित दंत उपचारांचा समावेश करण्यात आला आहे. सुलभ मौखिक आरोग्यसेवेच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात वैद्यकीय संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
एम. ए. रंगूनवाला कॉलेज ऑफ डेंटल सायन्सेस अँड रिसर्च सेंटरतर्फे आयोजित 20 व्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. डॉ. पी. ए. इनामदार यांच्या दूरदृष्टी आणि समर्पणामुळे या संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. शिक्षण आणि राष्ट्रनिर्मिती क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा समाजाला लाभ झाला आहे, असेही त्यांनी नमूद केले. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
डिजिटल साधने, कृत्रिम बुद्धिमत्ता, सिम्युलेशन आधारित शिक्षण आणि अद्ययावत उपचार पद्धतींमुळे दंतवैद्यक क्षेत्र झपाट्याने विकसित होत आहे. विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी संशोधन, नवकल्पना आणि स्वदेशी तंत्रज्ञान विकासावर भर द्यावा.- हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षणमंत्री