Pune Mahalakshmi Gold Crown Pudhari
पुणे

Pune Mahalakshmi Temple Gold Crown: पुण्यातील महालक्ष्मी देवीला २ किलो सोन्याचा रत्नजडित मुकुट

सारसबागेसमोरील मंदिरात घटस्थापनेच्या दिवशी सुवर्ण मुकुट अर्पण; लक्ष्मी-विष्णू आणि अष्टलक्ष्मींचे कलात्मक रूप, नक्षीकाम ठरतेय आकर्षण

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात सार्वजनिक नवरात्रोत्सवानिमित्त देवीसाठी अत्यंत आकर्षक आणि कलात्मक असा भव्य सुवर्ण मुकुट साकारण्यात आला आहे. सुमारे २ किलो सोन्यापासून तयार करण्यात आलेला रत्नजडीत मुकुट रविवारी (दि. ११) नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेला देवीला परिधान करण्यात आला.

मंदिर ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल म्हणाल्या की, मुकुटात श्री लक्ष्मी-विष्णू गरुडावर विराजमान असलेले मनोहारी रूप साकारण्यात आले आहे. यासोबतच अष्टलक्ष्मींच्या विविध स्वरूपांचे अत्यंत बारकाईने आणि कलात्मक पद्धतीने चित्रण केले आहे. याची निर्मिती राठोड ज्वेलर्सचे संजय राठोड यांनी केली आहे.

मुकुटाचे विशेष आकर्षण म्हणजे त्यामध्ये वापरण्यात आलेली विविध प्रकारची मौल्यवान रत्ने. प्रत्येक देवस्वरूपाच्या भावमुद्रा, चेहऱ्यावरील भाव आणि सूक्ष्म तपशील स्वतंत्रपणे अधोरेखित केले असून, त्यामुळे संपूर्ण कलाकृती अधिक जिवंत आणि देखणी भासते. उत्सवप्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल म्हणाल्या की, मुकुटावर करण्यात आलेले अतिशय सुबक आणि नाजूक नक्षिकाम हे विशेष लक्षवेधी आहे.

पारंपरिक धार्मिक संकल्पना, उत्कृष्ट सुवर्णकारिता आणि कलात्मक सौंदर्य यांचा सुंदर संगम या मुकुटात पाहायला मिळतो. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी हा सुवर्ण मुकुट विशेष आकर्षण ठरत असून, महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला आणखी एक दिव्य आणि वैभवशाली स्वरूप प्राप्त झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT