पुणे

Pune Lok sabha : मुरलीधर मोहोळांच्या गळ्यात लोकसभा उमेदवारीचा हार

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना कार्यकर्ता ते लोकसभेचा उमेदवार ही संधी मला मिळाली. भाजप एकमेव पक्ष आहे, की जो सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नेता करतो, अशी प्रतिक्रिया माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बुधवारी (दि. 13) व्यक्त केली. या वेळी कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयात जल्लोष करीत आनंद साजरा केला.

पुण्यातून माजी आमदार जगदीश मुळीक, माजी खासदार संजय काकडे, पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, शिवाजी मानकर आदी नेतेही लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. यासंदर्भात विचारणा केली असता मोहोळ म्हणाले, भाजप हा एकमेव असा पक्ष आहे, की जो लोकशाही प्रक्रिया मानतो. चार-पाच जण इच्छुक होते. पक्षातर्फे उमेदवारी एकालाच देता येते. गेल्या निवडणुकीत खासदार अनिल शिरोळे यांच्या जागी गिरीश बापट यांना उमेदवारी मिळाली. त्या वेळी शिरोळे यांच्या हस्ते बापट यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला होता. आमचा एक परिवार आहे.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वजण एकत्र येऊन प्रचाराला लागतात. पुण्याचा गेल्या दहा वर्षांत मोठा विकास झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी पुणेकर त्यांचे एक मत महायुतीला देतील आणि पुण्यात भाजपचा खासदार निवडून देतील, असा विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला. मोहोळ म्हणाले, पुण्यात मेट्रो सुरू झाली. चांदणी चौकात पूल उभारला. विमानतळ विस्तारीकरण, वैद्यकीय महाविद्यालय, नदी सुधारणा असे विविध प्रकल्प गेल्या दहा वर्षांत सुरू झाले. यामध्ये विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही मोठे सहकार्य झाले. पुण्याचे पुढील पन्नास वर्षांच्या विकासाचे व्हिजन समोर ठेवून काम करावयाचे आहे. पुण्याचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पक्ष कार्यालयात मोहोळ यांचे स्वागत केले. तसेच, त्यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. फटाक्यांची आतषबाजी झाली.

आज घेणार गणपतीचे दर्शन

भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे आज गुरुवारी (दि. 14) सकाळी सव्वाअकरा वाजता पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात दर्शनासाठी येणार आहेत. त्या वेळी पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे भाजपच्या वतीने बुधवारी सांगण्यात आले.

मोहोळ यांची राजकीय वाटचाल

  • पुण्याचे महापौर (2019 ते 2022)
  • स्थायी समिती अध्यक्ष 2017-18
  • पुणे स्मार्ट सिटीचे संचालक
  • भाजपचे प्रदेश सरचिटणीस
  • भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष व सचिव
  • भाजयुमो शहराध्यक्ष
  • महापालिकेत चारवेळा नगरसेवक
  • पुणे महापालिका शिक्षण मंडळाचे सभासद
  • खडकवासला मतदारसंघातून 2009 मध्ये उमेदवार

काँग्रेसच्या उमेदवाराची प्रतीक्षा

भारतीय जनता पक्षाने पुण्यातील उमेदवाराचे नाव जाहीर करीत आघाडी घेतली. प्रचाराचा प्रारंभ, बूथरचनेपर्यंत पक्षबांधणी करीत भाजपने निवडणुकीतील प्रचाराची रणनीती ठरविली आहे. महाविकास आघाडीत पुण्याची जागा काँग्रेसकडे येणार असून, आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी, शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. काँग्रेसचे उमेदवार पुढील आठवड्यात जाहीर होणार आहेत. काँग्रेसची उमेदवारी कोणाला मिळणार, याची प्रतीक्षा सध्या राजकीय वर्तुळात आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT