Pune PG Hostel Audit Pudhari
पुणे

Pune PG Hostel Fire Safety: लोहगाव-निंबाळकरनगरातील ११ पीजी, हॉस्टेलला महापालिकेने ठोकले सील!

अग्निसुरक्षा यंत्रणेसह आवश्यक परवानग्यांचा अभाव; तीन-चार मजली इमारतींत शंभरहून अधिक विद्यार्थी राहत असल्याचे तपासणीत उघड

पुढारी वृत्तसेवा

पुणे: आगीच्या दुर्घटनांनंतरही पुण्यातील विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था किती असुरक्षित आहे, याचा धक्कादायक प्रत्यय शुक्रवारी लोहगाव-निंबाळकरनगर परिसरात आला. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या तपासणीत अग्निसुरक्षेची कोणतीही यंत्रणा नसलेल्या तसेच आवश्यक परवानग्या उपलब्ध नसलेल्या ११ पीजी व होस्टेलला सील केले आहे.

तीन ते चार मजली इमारतींमध्ये शंभरहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी राहत असल्याचेही तपासणीत आढळले. देशभरातील आगीच्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शहरातील रुग्णालये, पीजी, होस्टेल व क्लासेसचे फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार अग्निशमन प्रमुख गणेश सोनुने यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी लोहगाव, निंबाळकरनगर परिसरातील पीजी व हॉस्टेलची पाहणी करण्यात आली. १० ठिकाणी सकाळपासून तपासणी करण्यात आली. अनेक ठिकाणी स्थायी किंवा अस्थायी स्वरूपाची अग्निशमन यंत्रणाच नसल्याचे आढळले. अशा परिस्थितीत आग लागल्यास मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने गंभीर दखल घेतली.

परवानग्यांचा पत्ताच नाही!

बिल्डिंग परमिशन, ड्रेनेज, पाणीपुरवठा, वृक्ष, स्ट्रक्चरल, कर विभाग तसेच अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) यापैकी आवश्यक परवानग्याही उपलब्ध नसल्याचे समोर आले. त्यामुळे अग्निशमन, बांधकाम व अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित आस्थापना बंद करून सील केल्या.

महाविद्यालयांची भूमिकाही तपासणार

तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता, काही महाविद्यालयांकडून पीजी व होस्टेलसाठी संदर्भ दिले जात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे अनधिकृत निवासव्यवस्था चालवणाऱ्या जागामालकांसह अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना संदर्भ देणाऱ्यांचीही चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

शाळा, रुग्णालयांवरही नजर

यापुढे शहरातील शाळा, महाविद्यालये, पीजी, हॉस्टेल, रुग्णालये आणि अन्य आस्थापनांचे फायर ऑडिट करण्यात येणार आहे. अग्निसुरक्षा यंत्रणा नसल्यास किंवा ती सुस्थितीत नसल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाणार आहे. सर्व आस्थापनांनी अग्निशमन यंत्रणा कार्यरत व सुस्थितीत ठेवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT