पुणे: गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक फळबाजारात लिंबाच्या मागणीत वाढ झाली आहे. आवकेच्या तुलनेत मागणी अधिक असल्याने १५ ते २० किलोच्या गोणीमागे १५० ते २०० रुपयांची दरवाढ झाली आहे. श्रावण महिन्यापासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत बहुतांश नागरिक मांसाहार टाळतात.
सोमवारपासून हा कालावधी संपत असल्याने लिंबाच्या मागणीत वाढ झाल्याची माहिती व्यापारी रोहन जाधव यांनी दिली. दरम्यान, उन्हाचा चटका कायम असल्याने कलिंगड, खरबूज, मोसंबी, संत्री आदी रसदार फळांना चांगली मागणी आहे. त्यामुळे खरबूज आणि पेरू वगळता सर्व फळांचे दर गत आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.
मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने खऱबूज किलोमागे पाच रुपये तर पेरू वीस किलोंच्या क्रेटस्मागे दोनशे रुपयांनी स्वस्त झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. रविवारी (दि. २५) लिंबाची एक हजार ते बाराशे गोणी, मोसंबी ६० ते ७० टन, संत्री २५ ते ३० टन, डाळिंब ७० ते ८० टन, पपई ९ ते १० टेम्पो, कलिंगड ५ ते ६ गाड्या, खरबूज १२ ते १३ टेम्पो, चिक्कू दोन हजार डाग, पेरू २ ते ३ हजार क्रेटस्, सीताफळ ८ ते ९ टन, ड्रॅगन फ्रूट ८ ते १० टन, सफरचंद सहा ते सात हजार पेट्या, बोरे ३० ते ३५ पोती आणि अननसाची ५ ट्रक आवक झाली.
फळांचे दर पुढीलप्रमाणे:
लिंबे (प्रतिगोणी) : ३०० ते २५००, मोसंबी (३ डझन) : १४० ते ३२०, (४ डझन) : ५० ते १३०, संत्री (१० किलो) : १५० ते ८००, डाळिंब (प्रतिकिलो) : भगवा : ७० ते २५०, आरक्ता : ५० ते १२०, गणेश : १० ते ४०, कलिंगड : १२ ते २०, खरबूज : २० ते ३५, पपई : १५ ते ३०, चिक्कू (१० किलो) : १०० ते ६००, पेरू (२० किलो) : ३०० ते ५००, अननस (१ डझन) : ३०० ते ९००, सीताफळ (प्रतिकिलो) : २० ते १००, ड्रॅगन फ्रूट (प्रतिकिलो) : २० ते १२०, सफरचंद (१५ ते २५ किलो) : १४०० ते ४५००, बोरे (१० किलो) : ९०-९००.