Land Records Pudhari
पुणे

Maharashtra Land Record Scam: पुण्यात जमीननोंदी घोटाळा; 152 महसूल अधिकारी दोषी

कलम 155 चा गैरवापर करून फेरफार; फौजदारी कारवाईची शक्यता, मोठा घोटाळा उघड

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे जिल्ह्यातील जमीननोंदीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी महसूल विभागातील 152 अधिकाऱ्यांना दोषी ठरविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या चौकशीत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 155 चा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात जमीन नोंदीमध्ये नियमबाह्य बदल करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

कलम 155 नुसार जमीननोंदीमध्ये महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना नोंदीत केवळ किरकोळ दुरुस्ती करण्याची परवानगी असते. मात्र, या तरतुदीचा गैरवापर करत संबंधित अधिकाऱ्यांनी मालकी हक्क, जमिनीचा प्रकार, क्षेत्रफळ यामध्ये मोठे बदल केले. यामुळे जिल्ह्यात जमीनविषयक वाद वाढले असून, अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत.

समितीने एकूण 38 हजार 27 तक्रारींपैकी 2 हजार 383 प्रकरणांची प्राथमिक तपासणी केली असता गंभीर अनियमितता आढळली. याप्रकरणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत माहिती देताना राज्यभर अशाच प्रकरणांचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील दोन महिन्यांत सर्व विभागीय आयुक्तांकडून अहवाल सादर होणार असून, गैरप्रकाराचे खरे स्वरूप समोर येणार आहे. दोषी अधिकाऱ्यांवर निलंबन, विभागीय चौकशी तसेच फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

...या आठवड्यात फौजदारी कारवाई?

चौकशीत नोटीस न देता आदेश काढणे, ऑफलाइन अर्ज स्वीकारणे, जमिनीचे वर्ग बदलणे तसेच मालकांची नावे वगळणे असे प्रकार उघड झाले. काही ठिकाणी जमीनमालकांच्या संमतीशिवाय नोंदी बदलून बेकायदा हस्तांतरण झाल्याचेही निदर्शनास आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पारदर्शकतेसाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये अडकलेल्या अधिकाऱ्यांवर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. ही प्रकिया सुरू करण्यात आली असून, या आठवड्यात हे गुन्हे दाखल होतील, अशी माहिती प्रशासनातील सूत्रांनी दै. ‌‘पुढारी‌’शी बोलताना दिली.

चलाख अधिकाऱ्यांनी‌ ‘ध‌’चा केला ‌‘मा‌’...

प्रामुख्याने शासनाने नावातील दुरुस्ती करण्यासाठी हा अधिकार तहसीलदारांना देण्यात आलेला आहे. पूर्वीच्या काळी जमिनीची कागदपत्रे तयार होत असताना काही चुका राहिलेल्या होत्या. त्या दुरुस्त्या करण्यात याव्यात, असा शासनाचा उद्देश होता. मात्र, चलाख अधिकाऱ्यांनी याचाच फायदा घेत सातबारे, फेरफारांवर ‌‘ध‌’चा ‌‘मा‌’ करत पाहिजे तसे आदेश दिल्याने चक्क सातबाराच बदलण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT