Land Scam Pudhari
पुणे

Pune Land Fraud Retired ACP: पुण्यात जमीन व्यवहारात 2.40 कोटींची फसवणूक; निवृत्त एसीपीसह पाच जणांवर गुन्हा

खोटे खाते, बनावट कंपनीच्या व्यवहारातून रक्कम उकळली; व्यावसायिकाला धमक्याही

पुढारी वृत्तसेवा

पुणे: जमीन खरेदीत मोठा फायदा करून देण्याच्या बहाण्याने एका निवृत्त सहायक पोलिस आयुक्ताने व्यावसायिकाची तब्बल 2 कोटी 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच, एका व्यक्तीच्या नावाने खोटे बँक खाते उघडून आणि बनावट कंपनीच्या नावाने व्यवहार करून रक्कम उकळल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी माजी सहायक आयुक्तासह त्यांच्या पत्नी, मुलासह पाच जणांविरुद्ध चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुशील शंकरराव कदम, नंदा कदम, अनिकेत कदम (तिघेही रा. तळवलकर जिमसमोर, फर्ग्युसन रस्ता), दत्ता केदारी (रा. बोरज, जि. पुणे) आणि बाळासाहेब आर. वाळुंज (रा. कामशेत, ता. मावळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अभिजित विलास उंद्रे (वय 35, रा. मांजरी खुर्द) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. ही घटना डिसेंबर 2016 ते 21 मे 2025 या कालावधीत घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, सुशील कदम हे पुणे पोलिस दलातून सहायक पोलिस आयुक्त म्हणून निवृत्त झाले आहेत. तक्रारदार हे व्यावसायिक आहे. कदम यांनी मुंबई येथील बालकिशन गुप्ता यांची खेड तालुक्यातील बोरज येथे मोक्याच्या ठिकाणी 12 एकर जमीन असून, ती विक्रीसाठी असल्याचे तक्रादारांना सांगितले. त्या जमिनीत गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा होईल, असे आमिष दाखवले.

तक्रारदारांकडील रक्कम स्वीकारण्यासाठी बालकिशन गुप्ता यांच्या नावाने खोटे बँक खाते उघडून तक्रारदारांकडून 50 लाख रुपयांची पे-ऑर्डर घेण्यात आली. तसेच सोलापूर येथील एका बँकेत ‌’ॲरिस्टोन मल्टीकेअर प्रा. लि.‌’ या कंपनीच्या नावाने बनावट खाते उघडून त्यामध्ये 25 लाख रुपये आरटीजीएसद्वारे जमा करण्यास भाग पाडले. त्यानंतर विविध कारणे सांगत तक्रारदारांकडून आणखी 30 लाख रुपये घेण्यात आले. याचबरोबर खरेदीखत करायचे असल्याचे सांगून 1 कोटी 35 लाख रुपये रोख स्वरूपात स्वीकारण्यात आले.

त्यानंतर संबंधित जमीनमालक बालकिशन गुप्ता हे जिवंत असतानाही ते मयत झाले असल्याचे खोटे सांगून व्यवहार पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे तक्रारदार उंद्रे यांनी पैसे परत मागितले असता, आरोपींनी टाळाटाळ केली. तसेच पैसे मागण्यासाठी वारंवार गेल्यास गायब करण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT