Voter List | मुळशी धरण भागातील 988 मतदार गायब Pudhari File Photo
पुणे

Voter List Manipulation: मुळशी धरण भागातील 988 मतदार गायब; ऐन निवडणूक काळात इच्छुकांसह मतदारांनाही धक्का

निवे गावातील तब्बल 236 मतदारांची नावे गायब झाली

पुढारी वृत्तसेवा

पौड : पुणे शहरातील कोथरूड भागात मुळशी तालुक्यातील तब्बल 988 मतदार नवीन मतदार म्हणून लावण्यात आलेले असून, मुळशी धरण भागातील मतदारयादीतून ते रहस्यमयरित्या गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मतचोरीबाबत शिवसेना (उबाठा) आक्रमक झाला असून, त्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. (Latest Pune News)

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर गावच्या मतदार यादीतून नावे वगळून कोथरूडमध्ये समाविष्ट झाली आहेत. तब्बल सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्याने मतदार याद्या अद्ययावत करण्यास वेग आला. दोन दिवसांपूर्वी धरण भागातील शिवसेना (उबाठा) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ऑनलाइन आपली नावे तपासली असता, ही नावे कोथरूडला समाविष्ट असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आसपासच्या गावातील कार्यकर्त्यांकडे चौकशी केली असता त्याठिकाणीही नावे गायब झाल्याचे त्यांना समजले. याबाबत कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांशी भेट घेऊन सखोल माहिती घेतली. त्या वेळी 988 मतदारांची नावेच गावातून गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

यामध्ये निवे गावातील तब्बल 236 मतदारांची नावे गायब झाली. वांद्रे आणि आदरवाडीतील प्रत्येकी 109 मतदार यादीतून गायब केले. त्याचप्रमाणे बार्पे (91), वडगाव (50), वाघवाडी (15), ताम्हिणी (44), ढोकळवाडी (35) अशी यादीतून नाव गायब केलेल्या मतदारांची संख्या आहे. आपल्या हक्काचे मतदार अचानक गायब केल्याने शिवसेनाही आक्रमक झाली असून, ग््राामस्थदेखील संतप्त झाले आहेत. त्यांनी निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनाविरोधात तीव निषेध व्यक्त केला आहे. लोकशाहीच्या मूलभूत हक्कावरच घाला घातल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

स्वतःच्या राजकीय भवितव्यासाठी गावाकडील मतांची चोरी करणारा कोथरूडमधील कार्यकर्ता नक्की कोण आहे, याचाही शोध घेण्याचे काम शिवसैनिक करीत आहे. यामध्ये गैरव्यवहार झाल्याची शक्यता आहे.
- अविनाश बलकवडे, विभागीय सचिव, युवा सेना
मतदारयादीतील नाव म्हणजे नागरिकाचा आवाज आणि तोच आवाज काढून टाकला गेला, तर लोकशाही जिवंत कशी राहणार?. शिवसेना या प्रकरणाच्या तळापर्यंत जाणार आहे. जोपर्यंत ही नावे पुन्हा गावच्या यादीत जोडली जात नाहीत, तोपर्यंत शिवसैनिक गप्प बसणार नाही.
- सचिन खैरे, तालुकाप्रमुख शिवसेना (उबाठा गट)
गावच्या यादीतून मतदारांची नावे वगळल्याच्या तक्रारी आल्या आहेत. ज्यांची नावे वगळली गेली आहेत, त्यांचा अर्ज क्रमांक सहा भरून घेऊन योग्य ते पुरावे घेऊन ही नावे पुन्हा गावच्या यादीत घेण्याची कार्यवाही करणार आहे.
- विजयकुमार चोबे, तहसीलदार, मुळशी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT