Hookah Pudhari
पुणे

Pune Illegal Hookah Raid: कोंढव्यातील पिसोळी फार्महाऊसवर छापा; बेकायदा हुक्का विक्रीवर कारवाई, ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त

काळेपडळ पोलिसांची मोठी कारवाई; फार्महाऊसवर चालणारा अवैध हुक्का अड्डा उघड

पुढारी वृत्तसेवा

पुणे: कोंढवा परिसरातील पिसोळी येथील एका फार्म हाऊसवर काळेपडळ पोलिसांनी छापा टाकून बेकायदा हुक्का विक्री व सेवन करणाऱ्यांवर कारवाई केली. तसेच ७५ लाख ८० हजार ७३९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी अनिस सय्यद व त्याचा साथीदार साद सय्यद यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील अवैध धंदे, तडीपार आरोपी व गुन्हेगारांवर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्या पार्श्र्वभूमीवर काळेपडळ पोलिस ठाण्याचे पथक गस्तीवर असताना पोलिस अंमलदार महादेव शिंदे आणि अतुल पंधरकर यांना पिसोळी येथील आंबिका हॉटेल रोड, जगदंबा मार्ग परिसरातील एका फार्महाऊसमध्ये अनिस सय्यद व साद सय्यद हे बेकायदा हुक्का विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी साध्या वेशात छापा टाकला असता, तेथे ८ ते १० जण हुक्क्याचे सेवन करताना मिळून आले.

पोलिसांनी तेथून तीन चारचाकी, दोन दुचाकी, १२ मोबाईल, ८ हुक्का पॉट, तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर व इतर साहित्य असा एकूण ७५ लाख ८० हजार ७३९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत आरोपींविरुद्ध काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलिस निरीक्षक अमित शेटे पुढील तपास करत आहेत.

ही कारवाई पोलिस उपायुक्त जीवन बेनिवाल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक (गुन्हे) अण्णासो बाबर यांच्या सूचनेनुसार सहायक पोलिस निरीक्षक अमित शेटे, उपनिरीक्षक रघुवीर खोडा तसेच पोलिस अंमलदार प्रवीण काळभोर, दाऊद सय्यद यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT