पुणे: पूर्ववैमनस्य आणि व्हॉट्सॲपवरील स्टेट्सच्या कारणातून झालेल्या वादात एका तरुणाच्या डोक्यात दगड, बीअरच्या बाटलीने मारहाण करून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. आकाश ऊर्फ आक्या किसन तराळे (वय 25, रा. खांदवेनगर, लोहगाव) असे खून झालेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी, खराडी पोलिसांनी विजय उर्फ जलवा संजय वाघमारे (वय 23, रा. राजाराम पाटीलनगर खराडी, मूळ. पालम, जि. परभणी) याला अटक केली आहे. याबाबत आकाश याचा मित्र अमित चंद्रकांत भोसले (वय 35, रा. उबाळेनगर, वाघोली, मूळ माणगाव, मुळशी) याने फिर्याद दिली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 8) रात्री सव्वानऊच्या सुमारास स्वास्थ्य क्लिनिक बिल्डिंगसमोर, स्वीट इंडिया चौकाजवळ, खराडी येथे घडली आहे. दरम्यान, यावेळी आरोपीने फिर्यादीला देखील हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजय ऊर्फ जलवा आणि खून झालेला तरुण आकाश उर्फ आक्या या दोघांत व्हॉटस्अप स्टेट्स ठेवल्याच्या कारणातून वाद झाला होता. गुरुवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास फिर्यादी अमित आणि आकाश खराडी येथील इंडिया चौकाजवळील परिसरात गप्पा मारत बसले होते. त्यावेळी आरोपी विजय तेथे आला.
त्याने आकाश याला तू सूरज साबळेचे स्टेटस् ठेवतो, सूरज साबळेचा मी बदला घेणार, मी तुझेसुद्धा काम तमाम करतो, असे म्हणून फिर्यादी व आकाश याला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर आकाश याच्या डोक्यात बीअरच्या बाटलीने मारहाण करून मोठा दगड डोक्यात घातला. त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने आकाशचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, पोलिस उपायुक्त सोमय मुंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. चव्हाण यांनी बोलताना सांगितले, आकाश आणि विजय हे दोघे पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.