Pune Police Bribe Case Pudhari
पुणे

Pune Police Bribe Case: तीनशे, दोनशेचा ‘नाद’ पोलिसाला पडला महागात

आकाश अरुण मुळे असे निलंबित केलेल्या पोलिसाचे नाव आहे.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: रात्रीच्या वेळी उशिरापर्यंत पानटपरी चालू ठेवून सिगारेट विक्री करताना पोलिस कर्मचाऱ्याने एकाला पकडले. मात्र, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे सोडून पाचशे रुपयांची सेटलमेंट करीत तीनशे रुपये घेणे खराडी पोलिस ठाण्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याला चांगलेच भोवले आहे.

पोलिस उपायुक्त अबिनाश कुमार यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत खाबुगिरी करणाऱ्या या पोलिस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. आकाश अरुण मुळे असे निलंबित केलेल्या पोलिसाचे नाव आहे.

मुळे खराडी पोलिस ठाण्यात नेमणुकीस असून, ३१ ऑगस्ट रोजी रात्रकर्तव्यावर होते. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या आस्थापनावर कारवाई करण्याचे कर्तव्य मुळे यांना दिले होते. रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास झेन्सार रोड खराडी परिसरात के. एन. स्मोक व्हॅली नावाचे पान शॉप त्यांना उघडे दिसले.

शॉप चालक कुमार नारायणकर हा सिगारेटची विक्री करीत होता. मुळे यांनी नारायणकर याला सिगारेट विक्री करताना पकडले. मुळे हे सर्व साहित्य घेऊन नारायणकर याच्यासह पोलिस ठाण्याकडे दुचाकीवरून निघाले. त्या वेळी मुळे यांनी त्याच्याकडे पाचशे रुपयांची प्रतिमहा हप्त्याची मागणी केली. आता किती देऊ शकतो, असे म्हणत तीनशे रुपये घेतले. तर, दोनशे रुपये उद्या देशील, असे म्हटले.

...असा आला प्रकार उजेडात

दरम्यान, हा प्रकार त्या दिवशी रात्रपाळी कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिस अधिकारी विशाखा म्हेत्रे यांच्या कानावर गेला. त्यांनी पान शॉपचालक नारायणकर याला बोलावून माहिती घेतली तेव्हा हा प्रकार समोर आला. पोलिस कर्मचारी मुळे यांनी त्यांच्याकडून तीनशे रुपये घेतल्याचे देखील नारायणकर याने आपल्या दिलेल्या जबाबात सांगितले आहे.

पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका

मुळे यांनी केलेले वर्तन पोलिस दलाच्या शिस्तीचे उल्लंघन, बेशिस्त व बेजबाबदारपणाचे असून, त्यामुळे पोलिस दलाची प्रतिमा जनमानसात मलीन झाल्याचा ठपका ठेवत त्यांचे निलंबन केल्याचे पोलिस उपायुक्त अबिनाश कुमार यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT