Police  Pudhari
पुणे

Pune Police Extortion: पुण्यात खाकीला काळिमा; गुटखा वसुली प्रकरणात कारवाई

खडक पोलिस ठाण्यातील दोन शिपायांवर तस्करांकडून पैसे उकळल्याप्रकरणी विभागीय कारवाई; पुणे पोलिस दलात खळबळ

पुढारी वृत्तसेवा

पुणे: गुटखा तस्करी रोखण्याऐवजी तस्करांनाच पकडून त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या खडक पोलिस ठाण्यातील ‌‘त्या‌’ दोन पोलिसांवर अखेर कारवाई करण्यात आली आहे. वसुलीचा हा काळा धंदा करणाऱ्या आशिष आदिनाथ चव्हाण आणि इरफान इमजुद्दीन नदाफ या पोलिस शिपायांची पुढील दोन वर्षांची वेतनवाढ रोखण्याचे आदेश पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी दिले आहेत. दोघांनी मिळून आपल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीबाहेर जाऊन गुटखा तस्करांशी ‌’डील‌’ केल्याचा आरोप आहे. दरम्यान, नदाफ यांना मुख्यालयाचा रस्ता दाखविण्यात आला, तर चव्हाण अद्यापही खडक पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.

22 नोव्हेंबर 2025 रोजी हा प्रकार घडला होता. त्यानंतर वरिष्ठ पातळीवर चौकशी, संबंधितांचे जबाब आणि इतर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. पोलिस शिपाई चव्हाण आणि नदाफ यांनी अन्सारी याच्या गुटख्याने भरलेल्या वाहनाचा खडक परिसरातील लोहियानगरपासून पाठलाग केला. दोघांनी हे वाहन कोरेगाव पार्क परिसरात अडवले. त्यानंतर चालक अन्सारी आणि गुटखा पुरवठादार गायकवाड या दोघांना त्रिकोणी गार्डन परिसरात नेण्यात आले. तिथे तस्करांवर गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि जप्त केलेला गुटखा परत करण्यासाठी पैशांची मागणी केली.

विशेष म्हणजे, या तथाकथित कारवाईची कोणतीही माहिती खडक पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली नव्हती. स्टेशन डायरीतही याची नोंद नव्हती, तसेच कारवाईसाठी पुरेसे पोलिस बळ किंवा अधिकृत परवानगी घेण्यात आली नव्हती. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने केलेल्या प्राथमिक चौकशीत, हे दोन्ही कर्मचारी दोषी आढळून आले होते. याप्रकरणी दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी ही कारवाई केली. वर्दीला काळिमा फासणाऱ्या या खाकीतील ‌‘वसुलीबहाद्दर‌’ शिपायांवरील कारवाईमुळे पुणे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

जबाब फिरविण्यासाठी दबाव

यातील गुटखा पुरवठादाराने सुरुवातीला ही कारवाई टाळण्यासाठी शिपायांनी आपल्याकडे पैसे मागितल्याचा जबाब दिला होता. मात्र, नंतर शपथपत्राद्वारे ‌‘पैसे दिले नाहीत‌’ असा दावा केला. दोन्ही शिपायांनी आपल्या पदाचा धाक दाखवून आणि एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून दबाव टाकून हा जबाब फिरवल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.

सीसीटीव्हीत येऊ नये म्हणून काळजी

कारवाईत पकडले जाऊ नये म्हणून दोन्ही शिपायांनी पद्धतशीर नियोजन केले होते. वाहन अडवल्यानंतर त्यांनी तक्रारदारांना मुद्दाम ‌‘त्रिकोणी गार्डन‌’ परिसरात नेले, जिथे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर नव्हती. कॅमेऱ्यांच्या कव्हरेजपासून दूर राहूनच त्यांनी पैशांची बेकायदेशीर तडजोड केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT