पुणे: आधीच आठवड्यातून एक दिवस पाणीकपात, त्यात रस्त्याच्या कामांमुळे विस्कळीत झालेला पुरवठा आणि आता कोणतीही पूर्वसूचना न देता गुरुवारी पाणी बंद! अशा तिहेरी कोंडीत कात्रज परिसरातील नागरिक सापडले आहेत. मंगळवार आणि बुधवारीच पाणी न मिळालेल्या भागांतील नागरिकांना गुरुवारच्या अतिरिक्त पाणीबंदमुळे सलग दोन ते तीन दिवस पाण्यासाठी वणवण करावी लागली.
वडगाव जलकेंद्रातून सिंहगड रस्ता, कात्रज, आंबेगाव, अप्पर इंदिरानगर, सुखसागरनगर आणि कोंढवा परिसराला पाणीपुरवठा होतो. जलकेंद्राची क्षमता आणि वाढती मागणी यांतील तफावत तसेच चोवीस तास पाणीपुरवठा योजनेतील अपूर्ण टाक्यांमुळे या भागांत रोटेशननुसार आठवड्यातून एकदा पाणी बंद ठेवले जाते.
मात्र, संपूर्ण परिसरात दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार नसल्याचे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले असतानाही गुरुवारी पाणी बंद करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याचीही संधी मिळाली नाही. त्यातच कात्रज-कोंढवा रस्तारुंदीकरण कामांमुळे जलवाहिन्या वारंवार बाधित होत आहेत. परिणामी, कमी दाबाने आणि कमी वेळ पाणी मिळत असल्याच्या तक्रारी आहेत.
शहरातील गुरुवारचा पाणीपुरवठा बंद असल्याने वडगाव जल केंद्रातून निघणार्या वाहिनीवर फ्लो मीटर बसवण्याच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. या परिसरात पूर्वीच्याच रोटेशननुसार आठवड्यातून एकदा पाणी बंद ठेवण्यात येणार असून, गुरुवारी पाणीपुरवठा सुरूच राहील.नंदकुमार जगताप, प्रमुख पाणीपुरवठा विभाग