Accident  Pudhari
पुणे

Pune Katraj Tunnel Accident: कात्रज बोगद्याजवळ एसटी-रिक्षा धडक; रिक्षाचालक ठार, 3 जखमी

समोरासमोर धडकेत भीषण अपघात; आंबेगाव पोलिसांकडून तपास सुरू, जखमींवर रुग्णालयात उपचार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: कात्रज येथील जुन्या बोगद्याजवळ भरधाव एसटी बस आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली. या धडकेत रिक्षाचालक ठार, तर तीन प्रवासी जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली. हनुमंत रमेश हंगरगे (वय 42, रा. सुखसागरनगर, बनकर शाळेजवळ, बिबवेवाडी) असे अपघातातील मृतकाचे नाव आहे.

राजेश इंगवले (वय 48, रा. गोकूळनगर, कात्रज-कोंढवा रस्ता), दशरथ निरगुडे (वय 43, रा. अप्पर बिबवेवाडी) आणि शहाजी लक्ष्मण शिवदे (वय 41, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) हे तीन प्रवासी अपघातात जखमी झाले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, कात्रज घाट बोगदा संपल्यानंतर पुण्याकडे येताना दुसऱ्या वळणावर राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस स्वारगेटवरून सांगली जिल्ह्यातील विटा येथे जात होती, तर तीन प्रवाशांना घेऊन रिक्षा खेड शिवापूर येथून स्वारगेटच्या दिशेने येत होती. सायंकाळी 5 वाजून 25 मिनिटांच्या सुमारास जुन्या बोगद्यात रिक्षा आणि बसची समोरासमोर धडक झाली. यात रिक्षाचालकासह प्रवासी जखमी झाले.

एसटी बसचालक जालिंदर विष्णू शिंदे (वय 53, रा. शेडगेवाडी, खानापूर, जि. सांगली) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एसटी बस ही स्वारगेटवरून विटा (सांगली) कडे जात होती, तर रिक्षाही खेड शिवापूरकडून स्वारगेटच्या दिशेने येत होती.

घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने व पोलिस कर्मचारी त्वरित घटनास्थळी पोहचले. जखमींना 108 ॲम्ब्युलन्सच्या मदतीने तातडीने रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. रिक्षाचालक गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या प्रकरणाचा पुढील तपास आंबेगाव पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT