Kasewadi Dies Plot Ward Development Pudhari
पुणे

Kasewadi Dies Plot Ward Development: काशेवाडी डायस प्लॉट प्रभागात बदल घडवणार; नगरसेविका मृणाल कांबळेंचा विकासाचा संकल्प

एसआरए घरे, ड्रेनेज, पाणीपुरवठा व रस्ते रुंदीकरणाला प्राधान्य; भाजपच्या ‘जायंट किलर’ नगरसेविकेचा रोडमॅप

पुढारी वृत्तसेवा

पुणे: काशेवाडी डायस प्लॉट प्रभागात अनेक समस्या या ‌‘जैसे थे‌’ आहेत. या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्याने काम करणार आहे. मोठी लोकसंख्या झोपडपट्‌‍ट्यांमध्ये राहते. एसआरएच्या माध्यमातून पुढील काही वर्षांत त्यांना चांगली घरे देण्याचा प्रयत्न राहणार आहे. यासह तरुणांना चांगले शिक्षण, रोजगार यासाठी देखील प्रयत्न करणार आहे. ड्रेनेजलाइन, पुरेशा दाबाने पाणी, रस्त्यांचे रुंदीकरण या गोष्टी प्राधान्याने करणार असल्याचा संकल्प भाजपच्या जायंट किलर ठरलेल्या नगरसेविका मृणाल कांबळे यांनी केला आहे.

मृणाल कांबळे या काशेवाडी डायस प्लॉट प्रभाग अ गटातून 14093 मते मिळवत विजयी झाल्या आहेत. त्यांनी कॉंग््रेासच्या इंदिरा बागवे यांचा पराभव केला आहे. त्यांनी ‌‘पुढारी‌’ला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या राजकीय प्रवास कथन केला, तसेच प्रभागात पुढील पाच वर्षांत करण्यात येणाऱ्या विकासकामांचा रोडमॅप त्यांनी सांगितला.

मृणाल कांबळे यांना राजकीय बाळकडू घरूनच मिळाले आहे. त्यांचे वडील बापू कांबळे हे भाजपचे या प्रभागातील प्रमुख नेते आहेत. ते या प्रभागातून नगरसेवक राहिले आहेत. आमदार सुनील कांबळे हे त्यांचे काका आहेत. बापू कांबळे हे 2012 च्या निवडणुकीत भाजपकडून उभे होते. ही निवडणूक मृणाल कांबळे यांनी जवळून पहिली व त्या राजकारणात आल्या.

निवडणूक कशी लढवावी, नागरिकांशी कसा संवाद साधावा, याचे धडे त्यांनी प्रत्यक्ष घेतले. पुढे 2017 मध्ये त्यांच्या बंधूंनी निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांच्या प्रचाराची धुरा मृणाल यांनी सांभाळली. मृणाल यांनी गरवारे येथून बी.कॉम. पूर्ण केले आहे. 2017 नंतर त्यांनी भाजप व आरएसएसच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. महिलांसाठी आरोग्य शिबिरे, बचत गटाच्या माध्यमातून रोजगार देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांना प्रशिक्षणाचे धडे दिले. 2026 च्या निवडणुकीत प्रभाग महिलांसाठी राखीव झल्यावर वडिलांनी त्यांना निवडणूक लढण्यास सांगितले. त्यांनी देखील होकार दर्शवत तयारी केली. समोर अनुभवी उमेदवार असताना देखील प्रचाराचे योग्य नियोजन करून त्यांनी नगरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. वडिलांच्या नावामुळे मी निवडून येऊ शकले असे त्यांनी आवर्जून सांगितले.

प्रभागात करणार ‌‘ही‌’ कामे

  • प्रभागात एसआरएची कामे सुरू आहेत. या माध्यमातून प्रभाग झोपडपट्टीमुक्त करायचा आहे.

  • प्रभागात ड्रेनेज नसल्याने व जे आहेत ती व्यवस्थित नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे प्राध्यान्याने ड्रेनेजची कामे करणार आहे.

  • प्रभागात पाणी कमी दाबाने येत असल्याने नव्याने पाइपलाइन टाकून रेल्वेस्थानकाला पाणी पुरवणाऱ्या लाइनमधून पाणीपुरवठा करणार.

  • झोपडपट्‌‍ट्यांमधील रस्ते अरुंद करणार. प्रामुख्याने घोरपडे पेठ ते नेहरू रस्त्यांचे रुंदीकरण करणार, तसेच डीपीआरमधील 24 मीटर रस्ते पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणार.

  • रस्त्यांच्या कामासाठी बाधित झालेल्यांना आरसेव्हनमधून घरे देणार. प्रभागात पावसाळी लाइन टाकण्याची कामे करणार.

  • काशेवाडी डायस प्लॉट लोहियानगर कचरामुक्त करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT