‘भूलतज्ज्ञ तुम्हीच आणा’; पुण्यातील नामांकित रुग्णालयाचा अजब सल्ला Pudhari
पुणे

Pune Hospitals: ‘भूलतज्ज्ञ तुम्हीच आणा’; पुण्यातील नामांकित रुग्णालयाचा अजब सल्ला

kamla nehru hospital: कमला नेहरू रुग्णालयातील प्रकार

पुढारी वृत्तसेवा

Private hospital controversy

पुणे: कमला नेहरू रुग्णालयात एका महिलेची पायाची शस्त्रक्रिया पार पडणार होती. शस्त्रक्रियेसाठी रुग्णाची तयारी करण्यात आली. मात्र, भूलतज्ज्ञ उपलब्ध नसल्याने शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत रुग्णाच्या नातेवाइकांनी नाराजी व्यक्त केल्यावर, ’भूलतज्ज्ञ तुम्हीच आणा, लगेच शस्त्रक्रिया करू’, असा अजब सल्ला देण्यात आला.

महापालिकेच्या शासकीय रुग्णालयांमध्ये गरीब आणि गरजू रुग्ण उपचारांसाठी येतात. मात्र, कर्मचार्‍यांकडून उद्धटपणे उत्तरे दिली जात असल्याचा अनुभव रुग्णांना अनेकदा येतो. रुग्णांशी नीट बोलण्याच्या सूचना अनेकदा देऊनही कर्मचार्‍यांच्या वागणुकीत फरक पडत नसल्याचे वारंवार निदर्शनास येते. असाच अनुभव कमला नेहरू रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाइकांना मंगळवारी आला. (Latest Pune News)

पायाला दुखापत झाल्याने उपचार घेण्यासाठी महिला कमला नेहरू रुग्णालयात दाखल झाली होती. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंगळवारी सकाळी शस्त्रक्रियेची तयारीही करण्यात आली.

मात्र, ऐनवेळी भूलतज्ज्ञ उपलब्ध न झाल्याने शस्त्रक्रिया होऊ शकणार नाही, अशी माहिती देण्यात आली. याबाबत विचारणा केल्यावर कर्मचार्‍यांनी अजब सल्ला दिल्याचे रुग्णाच्या नातेवाइकांनी सांगितले. कर्मचार्‍यांच्या अशा वागणुकीला कोण चाप लावणार, असा प्रश्न नातेवाइकांकडून उपस्थित केला जात आहे.

कमला नेहरू रुग्णालयात एकच भूलतज्ज्ञ आहेत. मंगळवारी रुग्णालयात एक शस्त्रक्रिया सुरू असल्याने भूलतज्ज्ञ तेथे उपस्थित होते. त्यामुळे दुसरी शस्त्रक्रिया त्यावेळी करणे शक्य नव्हते. मात्र, रुग्णालयातील कर्मचारीवर्गाने रुग्णाशी आणि नातेवाइकांशी उर्मट वर्तन करणे योग्य नाही. याबद्दल त्यांना समज दिली जाईल. तसेच, रुग्णाची शस्त्रक्रियाही तातडीने केली जाईल.
- डॉ. नीना बोराडे, आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT