Belhe Jejuri Road Blocked
पिंपरखेड: जांबुत (ता. शिरूर) येथे ७२ वर्षीय भागुबाई जाधव या महिलेचा बिबट हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेचा निषेध करत संतप्त जांबुत ग्रामस्थांनी जोपर्यंत या ठिकाणी जिल्हाधिकारी येत नाही, तोपर्यंत मृतदेह घटनास्थळी ठेऊनच पंचतळे येथे बेल्हे - जेजुरी राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. अतिरिक्त जिल्हाधिकारी, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक यांनी आंदोलन स्थळी व घटना स्थळी भेट दिली.
यावेळी अपर जिल्हाधिकारी यांनी यासंदर्भात आठ दिवसांत जिल्हाधिकारी या ठिकाणी येऊन भेट देतील त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात पुढील बैठक लावण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला.
मागील आठ दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात शिवन्या बोंबे यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच जांबुत येथे सकाळी बिबट्याच्या हल्ल्यात भागुबाई जाधव या ७२ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने स्थानिक नागरिक व जांबुतचे ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.
या भागात मृत्यूची आठवी घटना घडूनही प्रशासनाला जाग येत नसल्याने बिबट्याने अर्धवट खाल्लेला मृतदेह उसाच्या बाहेर काढून जोपर्यंत जिल्हाधिकारी आणि वनमंत्री याठिकाणी येत नाही, तोपर्यंत शवविच्छेदनासाठी मृतदेह हलवू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत बेल्हे जेजुरी राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले.
यावेळी संतप्त नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर घटनास्थळी खासदार अमोल कोल्हे, पुण्याचे अपर जिल्हाधिकारी सतिश राऊत, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, जुन्नर विभागाचे उपवनसंरक्षक संतोष खाडे, प्रांताधिकारी पूनम अहिरे, शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी भेट देत आंदोलनाची पार्श्वभूमी समजून घेतली.
पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याशी चर्चा करून पुढील आठ दिवसांत जांबुत (ता. शिरूर ) येथे जिल्हाधिकारी बैठक लावून ग्रामस्थांच्या मागणीनुसार तातडीने प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविणार असल्याचे आश्वासन अपर जिल्हाधिकारी सतिश राऊत यांनी दिले.
या घटना दुर्दैवी असून आपण हा प्रस्ताव लवकरच वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल. ग्रामस्थांनी तत्पूर्वी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल यांनी केले. तर पुढील पंधरा दिवसांत मागणी केल्यानुसार दोनशे पिंजरे मागविण्यात येणार असून तातडीने ते या परिसरात बसविण्यात येणार असल्याचे जुन्नरचे उपवनसंरक्षक संतोष खाडे यांनी सांगितले.
त्यानंतर उपस्थित अधिकारी यांनी जांबुत थोरात वस्ती येथे प्रत्यक्ष उसाच्या शेतात घटनास्थळी जाऊन माहिती घेत कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, वनपरिक्षेत्र अधिकारी नीलकंठ गव्हाणे यांच्यासह वनविभाग व पोलिस प्रशासनाकडून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.