पुणे: अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर सुरू केलेल्या धडक कारवायांचा फटका आता पुण्यातील गूळ बाजारालाही बसू लागला आहे. भेसळ आणि नियमबाह्य उत्पादनांविरोधातील मोहिमेमुळे दौंड, तसेच सांगली परिसरातील शेकडो गुऱ्हाळांनी उत्पादन थांबविल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील गुळाची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. एरवी दररोज ७० ते ८० टन गुळाची आवक होणाऱ्या बाजारात ती घसरून केवळ २० टनांवर आली असून, व्यापारी व शेतकरीवर्गात चिंता व्यक्त होत आहे.
पुण्याच्या गूळबाजारात मुख्यतः सांगली जिल्ह्यातून आणि दौंड तालुक्यातून गुळाची आवक होते. मात्र, उसाचे वाढलेले दर, गुळाला मिळत असलेला तुलनेने कमी भाव आणि एफडीएकडून सुरू असलेल्या कारवायांमुळे उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. रंग व साखरेचा वापर केल्याच्या संशयावरून अनेक गुऱ्हाळांवर धाडी पडल्याने केडगावसह दौंड परिसरातील जवळपास ४०० गुऱ्हाळे बंद पडली आहेत. त्यामुळे उत्पादन साखळीच विस्कळीत झाली आहे.
साधारणपणे, दौंड तालुक्यातील गुऱ्हाळांमधून दररोज सुमारे ८०० टन गुळाचे उत्पादन होत असून, हा माल राज्यासह देशातील विविध भागांत पाठविला जातो. मात्र, गेल्या चार दिवसांपासून उत्पादन ठप्प असल्याने त्याचा थेट परिणाम पुण्याच्या बाजारावर दिसून येत आहे. गुऱ्हाळ चालकांनी आता साखर व रंगाचा वापर टाळून दर्जेदार गूळ उत्पादन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत असून, येत्या काळात उत्पादन वाढण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, अधिक महिन्यामुळे लग्नसराई आणि सणावारांचा हंगाम नसल्याने गुळाची मागणीही सध्या मर्यादित आहे.
नेहमीची आवक: ७० ते ८० टन प्रतिदिन
सध्याची आवक :२० टन प्रतिदिन
घट: सुमारे ७५ टक्के
प्रभावित क्षेत्र: दौंड, केडगाव, सांगली
बंद गुऱ्हाळे: सुमारे ४००
घाऊक बाजारातील गुळाचे दर (प्रतिक्विंटल):
गूळ नं. १ - ४६५०-४८५०, गूळ नं. २ - ४५००-४६००, गूळ नं. ३ - ४३००-४४५०, बॉक्स ४५००-५५००रु. किरकोळ दर (प्रतिकिलो) : 55 ते 65 रुपये.
एफडीएच्या कारवायांनंतर दौंड आणि सांगली भागातील अनेक गुऱ्हाळांमधील उत्पादनावर परिणाम झाला आहे. सध्या बाजारात शिल्लक माल उपलब्ध असल्याने तुटवडा जाणवत नाही. मात्र, आवक कमी राहिली आणि मागणी वाढली, तर येत्या काळात गुळाच्या दरात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुणवत्तापूर्ण गुळ उत्पादनासाठी नियमांचे पालन होणे आवश्यक आहे; मात्र उत्पादन आणि बाजारव्यवस्थेवर त्याचा परिणामही लक्षात घ्यावा लागेल.जवाहरलाल बोथरा, गूळ व्यापारी, मार्केट यार्ड