Hinjawadi IT Company Shutdown Pudhari
पुणे

IT Company Shutdown: पुण्यातील IT कंपनी एका रात्रीत अचानक गायब; पगार थकले, चेक बाऊन्स, 700 हून अधिक कर्मचारी बेरोजगार

Hinjawadi IT Company Shutdown: पुण्यातील हिंजवडीतील Think Technology India कंपनी अचानक बंद झाल्याने 700 हून अधिक कर्मचारी बेरोजगार झाल्याचा आरोप आहे.

पुढारी वृत्तसेवा

Hinjawadi IT Company Shutdown: पुण्यातील हिंजवडी IT पार्कमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हिंजवडी फेज-2 मधील एका IT कंपनीने अचानक कार्यालय बंद केल्याने 700 हून अधिक कर्मचारी, इंजिनिअर्स आणि इंटर्न्स अक्षरशः रस्त्यावर आल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनेक महिन्यांपासून पगार रखडल्याचा, दिलेले धनादेश बाऊन्स झाल्याचा आणि आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप कर्मचाऱ्यांनी कंपनीवर केला आहे.

हिंजवडीतील Gera’s Imperium Rise इमारतीत कार्यरत असलेली Think Technology India ही कंपनी अचानक बंद झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. प्रभावित कर्मचाऱ्यांच्या मते, कंपनीने 2025 मध्ये मोठ्या प्रमाणावर भरती केली होती. यात फ्रेशर्स, इंटर्न्स आणि IT व्यावसायिकांना मोठ्या संख्येने नोकरी देण्यात आली होती.

सुरुवातीच्या काळात इंटर्न्सना दरमहा 15 हजार रुपयांचे स्टायपेंड वेळेवर मिळत होते. त्यामुळे कंपनीबद्दल विश्वास निर्माण झाला होता. मात्र 2026 च्या सुरुवातीपासून परिस्थिती बदलू लागली, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

पगार थांबले आणि अचानक ऑफिसच बंद

कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, फेब्रुवारी 2026 पासून पगार नियमित मिळणे बंद झाले. दर महिन्याच्या 7 किंवा 8 तारखेला मिळणारा पगार वेळेवर जमा होत नव्हता. याबाबत विचारणा केल्यावर कंपनीचे CEO आणि संचालक हर्षल भानुदास ठाकरे यांनी कंपनीत अंतर्गत ऑडिट सुरू असल्याचे सांगत पगार 25 ते 28 फेब्रुवारीदरम्यान दिले जातील, असे आश्वासन दिले होते.

मात्र, कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ठरलेल्या मुदतीनंतरही पगार जमा झाला नाही. त्यानंतर अचानक कंपनीचे कार्यालय बंद असल्याचे समोर आले आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीती पसरली.

पगाराचे चेक बाऊन्स, कर्मचारी आर्थिक अडचणीत

काही कर्मचाऱ्यांनी असा आरोप केला आहे की, कंपनीकडून पगारासाठी देण्यात आलेले धनादेश बँकेत जमा केल्यानंतर बाऊन्स झाले. त्यामुळे अनेक कर्मचारी गंभीर आर्थिक अडचणीत सापडले आहेत. घरभाडे, EMI आणि दैनंदिन खर्च भागवणे कठीण झाल्याचे कर्मचारी सांगत आहेत.

लॅपटॉपच्या नावाखाली 15 हजारांची सिक्युरिटी

या प्रकरणाची दखल Forum of IT Employees (FITE) या संघटनेने घेतली आहे. संघटनेचे अध्यक्ष पवनजीत माने यांनी सांगितले की, अनेक प्रभावित कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी संघटनेकडे धाव घेतली असून पोलिसांकडे तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

माने यांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीने कर्मचाऱ्यांकडून लॅपटॉप देण्याच्या नावाखाली 15 हजार रुपयांचे सिक्युरिटी डिपॉझिट घेतले होते. हा प्रकार IT क्षेत्रातील गंभीर घोटाळा असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

कामगार मंत्रालयापर्यंत पोहोचलं प्रकरण

या प्रकरणाची माहिती कामगार मंत्रालयालाही देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आणि तरुण IT व्यावसायिकांचे आर्थिक शोषण रोखण्यासाठी सरकारने कठोर धोरणे आणण्याची मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात पोलिसांकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या असून पुढील तपास सुरू आहे. कंपनी व्यवस्थापनाकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT