Pune IT Engineer Found Dead at TCS Campus in Hinjawadi: पुण्यातील आयटी क्षेत्रातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करत असलेल्या एका तरुण आयटी इंजिनिअरचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली असून, या घटनेमुळे आयटी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, Tata Consultancy Services (TCS) मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करणारा 24 वर्षीय सुजल विनोद ओसवाल याचा मृतदेह राजीव गांधी आयटी पार्क, हिंजवडी फेज-3 येथील कंपनीच्या परिसरात आढळून आला. सुजल हा वानवडी परिसरात राहत होता.
पोलिस तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुजल सोमवारी रात्री उशिरा ऑफिसला आला होता. कॅन्टीनमध्ये काही वेळ घालवल्यानंतर तो एका बंद असलेल्या ठिकाणी गेला. मंगळवारी सकाळी कर्मचाऱ्यांना तो बराच वेळ दिसला नाही, त्यामुळे शोध घेतला असता त्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी सांगितले की, मृत्यूपूर्वी सुजलने आपल्या कुटुंबीयांना एक मेसेज पाठवला होता. या मेसेजमध्ये त्याने ऑनलाईन सट्टा/बेटिंगमधील आर्थिक तोट्याबद्दल माहिती दिली होती. याच आर्थिक अडचणी आणि मानसिक तणावामुळे हा टोकाचा निर्णय घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाणे येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, तपास सुरू आहे. झोन -2 चे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी सांगितले की, घटनेमागची नेमकी कारणे शोधण्यासाठी सखोल चौकशी केली जात आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळाजी पंढरे हा तपास करत आहेत.
ही घटना एका तरुणाच्या मृत्यूची नाही, तर ऑनलाईन जुगार, आर्थिक ताण आणि मानसिक आरोग्य यासारख्या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधणारी आहे. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांमध्ये वाढणारा ताण आणि एकटेपणा यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.