पुणे : पुढारी वृत्तसेवा : वन विभागाच्या रेस्क्यू टीमसह वरिष्ठ अधिकार्यांनी शुक्रवारी सायंकाळी वडगाव खुर्द येथील प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रकल्पाला भेट दिली आणि परिसरात वावरणार्या बिबट्याच्या पाऊलखुणा व अन्य माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला.
दै. 'पुढारी'ने दि. 3 मेच्या अंकात 'वडगाव खुर्द परिसरात बिबट्याचा वावर' या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याची तत्काळ वन विभागाच्या अधिकार्यांनी दखल घेत शुक्रवारी सायंकाळी सिंहगड पीएमएवाय गृहरचना सोसायटीला भेट दिली व बिबट्याचा बंदोबस्त करण्यात येईल, असे आश्वस्त केले.
या वेळी वनपाल विद्याधर गांधीली, वनरक्षक कृष्णा हाके, वनरक्षक दयानंद गायकवाड यांच्यासह रेस्क्यू टीमचे कर्मचारी आणि सोसायटीचे अध्यक्ष सचिन देशमुख, स्थानिक रहिवासी प्रतीक गवळी, सुदाम कुंभार, मंगेश उल्हलकर, माऊली शिनगारे, मकरंद धादवड, श्रीनिवास काँगरी, चेतन संब्रे, दिनेश शिंदे व अन्य उपस्थित होते. या वेळी वन अधिकार्यांनी येथील परिसराची पाहणी केली. बिबट्या दिसल्यावर प्रथमत: काय काळजी घ्यावी, याबाबत माहिती दिली. रात्रीच्या वेळी लहान मुलांना घराबाहेर न सोडण्याच्या सूचना देत परिसरात सर्वत्र प्रकाश यंत्रणा (लाइट्स) कार्यान्वित करण्याच्या सूचना देखील दिल्या. तसेच, वन विभागातर्फे येथील रहिवाशांना येत्या रविवारी एकत्रितपणे पीपीटीद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
हेही वाचा